‘आईचा उदो उदो!’ नवरात्रोत्सवासाठी अंबानगरी सज्ज
अंबा - एकविरा मंदिरात उद्यापासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ

भक्तांसाठी 5 मिनिटांत सुलभ दर्शनाची व्यवस्था
एक लाख भाविकांच्या दर्शनाचे नियोजन पूर्ण
पंचमीला मंदिरात मोफत महाप्रसादाचे वाटप
मंदिर परिसरात 150 कॅमेरे व 40 पोलिसांचा खडा पहारा
तब्बल 20 ते 22 तास दर्शन खुले ठेवण्यावर भर
अमरावती/ 9 ऑक्टोबर – ‘प्यारा सजा है तेरा दरबार भवानी…’ या भक्तिमय वातावरणात कुलस्वामिनी अंबादेवी व एकवीरा देवीच्या दरबारात अश्विन नवरात्रोत्सवाची मंगलमय तयारी पूर्ण झाली असून आज रविवार 11 ऑक्टोबरपासून घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ होत आहे, दररोज 1 लाख भाविक येण्याची शक्यता पाहता संस्थानांनी अवघ्या 5 ते 15 मिनिटात सुलभ दर्शनाची उत्तम सोय केली असून 150 पेक्षा जास्त कॅमेरे आणि दोन्हीकडे प्रत्येकी 40 पोलिसांचा खडा पहारा तैनात ठेवला आहे.
अंबानगरीचा सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून ओळखल्या जाणार्या अश्विन नवरात्रोत्सवाची भक्तीमय तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी अंबादेवी व एकवीरा देवीचे दरबार सुंदर सजले आहेत. ऑक्टोबर महिन्यातील कडक ऊन लक्षात घेऊन भाविकांच्या सावलीसाठी भव्य मंडप उभारले आहेत. दर्शनासाठी येणार्या महिला आणि पुरुषांसाठी नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या रांगांची सोय केली आहे. देवी चरणी ओटी भरणार्या भाविक माता भगिनींसाठी स्वतंत्र रांग उपलब्ध करून दिली आहे. अंबादेवी संस्थानचे अध्यक्ष ड. दीपक श्रीमाली आणि एकवीरा संस्थानचे अध्यक्ष टेंबे यांनी भाविकांना अवघ्या 5 मिनिटात मातेचे दर्शन घडवण्याचा शब्द दिला आहे. दिवसभरात तब्बल 20 ते 22 तास दर्शन खुले ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.
अंबादेवी दरबारी रविवार 11 ऑक्टोबर रोजी भल्या पहाटे 4.30 वाजता मंत्रघोषात घटस्थापना पूजा पार पडेल. मंदिराचे सचिव रवींद्र कर्वे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते ही विधीवत पूजा संपन्न होईल. सकाळी 7.30 वाजता दुर्गा सप्तशती पाठ तर सकाळी 8.30 वाजता डॉ. जयंत पांढरीकर यांच्या हस्ते झेंडा फडकवला जाईल. पुरुषांच्या सोयीसाठी लाकडी चबूतरा तयार केला असून सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक कठडे उभारले आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिराभोवती 4 हजार चौरस फुटांचा मोठा मंडप उभारला आहे. संस्थानचे अध्यक्ष ड. दीपक श्रीमाली आणि विश्वस्त सुरेंद्र बुरंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार अंबादेवी दरबारी 40 कॅमेरे आणि 30 सुरक्षा रक्षक तैनात आहेत. तसेच भाविकांच्या मदतीसाठी संस्थानचे 44 रक्षक, 70 महिला आणि 20 तरुण असे मिळून 134 जण रांगेत सज्ज राहतील. याशिवाय पुरोहित मंडळी व नित्य कर्मचारी उपस्थित राहतील. ललिता पंचमीला मातेचा विशाल जागर होणार असून हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावणार आहेत. एकवीरा देवी दरबारी रविवार 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता चंद्रशेखर कुलकर्णी आणि स्वाती कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्रोच्चारात घटस्थापना पूजा होईल. नवरात्रातील पवित्र अष्टमी आणि नवमीला पारंपारिक होम हवन पार पडतील. उत्सव काळात नऊ दिवसांत 94 पेक्षा जास्त महिला भजनी मंडळ भक्तीगीतांची सेवा देतील. रविवार 11 ते 18 ऑक्टोबर दरम्यान दररोज रात्री 8 ते 10 या वेळेत नागपूरचे राहुल गणोरकर यांचे कीर्तन होईल. यात संवादिनीवर अतुल भातकुलकर तर तबल्यावर स्वप्नील सरदेशमुख साथ देतील. सोमवार 19 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता शालिग्राम महाराज खेडकर यांचे वारकरी कीर्तन रंगेल. विश्व हिंदू परिषद मातृ शक्तीतर्फे 16 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता सप्तशती पाठ होईल. अन्नछत्रात दुपारी 12 ते 2.30 दरम्यान मोफत महाप्रसाद वाटप राहील. यासाठी 150 अतिरिक्त मदतनीस आणि संस्थानचे 100 कर्मचारी मिळून सुमारे 300 जण कामाला लागल्याचे चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सांगितले.





