एमपीएससी आजी-माजी अध्यक्षांसह सदस्यांवर होणार कारवाई
फडणवीसांची राज्यपालांकडे समितीची शिफारस

मुंबई /5 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्याकडे विनंती केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष, तसेच सदस्य यांच्याविरोधात संविधानाच्या कलम 317 प्रमाणे कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याची विनंती राज्यपालांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करून3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती करणारी शिफारस राज्यपालांकडे सादर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्यापूर्वी त्यांची चौकशी करावी लागते, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आयोगाचे अध्यक्ष, सदस्य यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांना केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचं निष्पन्न झालं आहे. तीन विद्यार्थ्यांना पेपरचा लाभ झाल्याचं समोर आलं होतं. या तीन विद्यार्थ्यांसह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.





