महात्मा गांधीजी यांच्या 157 व्या जयंती निमित्य प्रश्नमंजुषा स्पर्धा
विजेत्यांना पारितोषिक वितरण, काँग्रेस सेवादलाचे प्रदेश सचिव अभिनंदन पेंढारी याचे आयोजन

अमरावती /2 ऑक्टोबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157 व्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमरावतीत भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस भवनात पार पडलेल्या या संस्मरणीय कार्यक्रमात अमरावती शहरातील विविध शाळांमधून तब्बल आठशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महात्मा गांधींच्या जीवनचरित्राचा व विचारांचा गाढा अभ्यास असल्याचे सिद्ध केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे सचिव अभिनंदन पेंढारी यांनी या प्रेरणादायी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर प्रास्ताविकेतून आयोजकांनी आजच्या युवा पिढीला गांधीजींचे विचार आणि त्यांचे स्वावलंबी संग्रामातील अमूल्य योगदान समजणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. या विशेष स्पर्धेच्या निमित्ताने शहरात चैतन्यमय वातावरण पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना थोर पुरुषांच्या जीवनचरित्राचा गांभीर्याने अभ्यास करून त्यांचे विचार नेहमी आचरणात आणण्याचे आवाहन केले. प्रश्नमंजुषेत उत्कृष्ट यश संपादन करणार्या आणि सर्वाधिक गुण मिळवणार्या तीन प्रमुख विद्यार्थ्यांना तसेच तीन प्रोत्साहनपर पारितोषिक मिळवणार्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह, मेडल आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये विक्रम कांबळे, प्रयी ठाकूर, तरुण विजयकर, दिव्या डोळे, आयुषी घोडेकर आणि गौरी जितोडे या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. तसेच परीक्षा पत्रिका तयार करणे आणि तपासणी करण्याचे मोलाचे काम करणार्या मान्यवरांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शहर काँग्रेस अध्यक्ष यांनी भूषवले. यावेळी खासदार बळवंतराव वानखेडे, सुनीलभाऊ देशमुख, बाबुभाऊ देशमुख, बाबुभाऊ शेखावत, विलासभाऊ इंगोले, पुरुषोत्तमभाऊ मुंदडा, प्रदीप देशमुख, भैय्यासाहेब पवार, जयश्री वानखेडे, प्रा. दिलीप खांबोरकर, सुष्मताताई ताजोणे आणि छाया बवणे यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक हुंड्रीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेंद्र तायडे यांनी मानले.





