भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर
नागपूरमधून सुधाकर कोहळे तर पुण्यातून डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांना संधी

मुंबई/4 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 साठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने तीन उमेदवारांच्या नावांना अधिकृत मंजुरी दिली आहे. 4 ऑक्टोबर 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकातून ही घोषणा करण्यात आली. यामध्ये पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. (श्रीमती) स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून श्री सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना भाजपने मैदानात उतरवले आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणार्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी या नावांना मान्यता दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांना मिळालेली उमेदवारी विशेष चर्चेची ठरणार आहे.भाजपचे खासदार तरुण चुघ यांच्या स्वाक्षरीने हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. तरुण चुघ हे राज्यसभा खासदार असून भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयाचे प्रभारी आहेत. 4 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर झालेल्या या उमेदवारीमुळे महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय हालचालींना आता वेग येण्याची शक्यता आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे आणि अनिल सोले हे भाजपमधील प्रमुख इच्छुक होते. उमेदवारीचा निर्णय होण्यापूर्वी दोन्ही नेत्यांकडून मतदारसंघात तयारी सुरू होती. अखेर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने 4 ऑक्टोबरला सुधाकर कोहळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
यापूर्वीच्या निवडणुकीतही भाजपने अनिल सोले यांच्या ऐवजी संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. यावेळी पुन्हा उमेदवारी न मिळाल्यानंतर सोले यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सोले हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय आणि सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी नागपूरचे महापौरपदही भूषवले आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधाकर कोहळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
कोहळेंनी मुख्यमंत्र्यांची भेट
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुधाकर कोहळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी उमेदवारीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या भेटीच्या पार्श्वभूमीवर अनिल सोले यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षात प्रयत्न होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
माजी आमदार सोले बंडखोरीच्या तयारीत
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. या जागेसाठी इच्छुक असलेले माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी 5 ऑक्टोबर रोजी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.





