अमरावती मनपाच्या तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

कचरा व्यवस्थापन कंत्राटदाराची कोट्यवधींची फसवणूक

76 वाहने परस्पर पळवून तिघांनी केला घोळ
गाड्यांच्या विक्री व्यवहारात पावणेतीन कोटींचा अपहार
कंपनी व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून आरोपींवर कारवाई

अमरावती /2 ऑक्टोबर- महानगरपालिकेच्या घनकचरा वाहतुकीचे कंत्राट मिळविणार्‍या कोणार्क कंपनीची वाहने खरेदी करण्याच्या नावाखाली 2 कोटी 75 लाख 80 हजार 300 रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यस्थी करणार्‍या तिघांनी पावणेतीन कोटी रुपये उकळले आणि अचानक वाद उकरून काढत सर्व 76 गाड्या परस्पर पळवून नेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावती महानगरपालिकेचे घनकचरा संकलन व वाहतुकीचे काम कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला मिळाले होते. या कामासाठी वाहनांची नितांत गरज असल्याने कर्नल सिंग राहल यांनी मध्यस्थी केली. त्यांनी तुळजाई ट्रान्सपोर्ट आणि नागरिक सेवा सहकारी संस्थेकडून 76 गाड्या खरेदी करून देण्याचा तोंडी व्यवहार ठरवून दिला. त्यानुसार कंपनीने तुळजाई ट्रान्सपोर्टला 16 गाड्यांसाठी 53 लाख 80 हजार 300 रुपये दिले. तसेच नागरिक सेवा सहकारी संस्थेला 60 गाड्यांच्या बदल्यात 2 कोटी 22 लाख रुपये दिले. ही सर्व रक्कम कंपनीने टप्प्याटप्प्याने ऑनलाईन आणि धनादेशाद्वारे प्रामाणिकपणे अदा केली होती. एवढेच नाही तर 60 पैकी 47 वाहनांच्या कराच्या पावत्याही कंपनीने स्वतःकडे घेतल्या होत्या.
सर्व सुरळीत चालू असताना 19 सप्टेंबर रोजी वाहनांच्या व्यवहारावरून तिघांनी विनाकारण वाद उभा केला. कंपनीला कोणतीही पूर्वकल्पना न देतआरोपींनी कंपनीच्या ताब्यातील सर्व 76 गाड्या बळजबरीने परस्पर पळवून नेल्या. वाहने गेल्याने काम ठप्प झाले. त्यानंतर कंपनीच्या अधिकार्‍यांनी वाहने परत मागितली आणि पक्क्या कराराची मागणी लावून धरली. मात्र आरोपी सातत्याने टाळाटाळ करून धमकावू लागले. फावासाणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीचे स्थानिक व्यवस्थापक आदित्य सुरवाडे यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी संशयित आरोपी कर्नल सिंग राहल, राजेश गुप्ता, मनोज रामरतन साबू या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल केला असून पोलीस आता पुढील तपास करीत आहेत.

Back to top button