21 शेतकर्यांची 85 जनावरे लंपास, पोलिसांविरोधात संताप
वणी बेलखेड्यात अन्नत्याग आंदोलन

-जनावर चोरट्यांचा हैदोस
-पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
चांदुर बाजार: चांदुर बाजार तालुक्यातील वणी बेलखेडा या गावात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: या परिसरात जनावर चोरट्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. शेतीसह पशुपालनाचा व्यवसाय करणार्या गरीब, गरजू 21 शेतकर्यांची 85 जनावरे अलीकडे चोरीला गेली आहेत. या जनावर चोरीच्या घटनांना आळा घालण्यात ब्राम्हणवाहा थडी पोलिस अपयशी ठरत असून पोलिसांची अकार्यक्षमता त्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचा आरोप करित शेतकर्यांनी पोलिसांच्या विरोधात 27 जूनपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. वणी बेलखेडा गावातील शेतकरी मुकेश अलोने यांच्यासह अनेक शेतकरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
चांदुर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या वणी बेलखेडा या गावातील पशुपालक शेतकर्यांच्या बैलजोडी, गाई, शेळी, म्हशी या जनावरांसोबतच शेतकर्यांच्या शेतामधील शेतीचे साहित्य चोरीला गेल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. एकूण 85 जनावरांच्या चोरीच्या तक्रारी ब्राह्मणवाडा थडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकारांमुळे शेतकर्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे. गावकर्यांनी ब्राह्मणवाडा पोलिसांसोबतच अमरावती येथे वरिष्ठ अधिकार्यांकडेही या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वारंवार निवेदन देवून व पाठपुरावा करुनसुद्धा पोलिसांकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. साधी चौकशीही झाली नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
10 दिवसात तपास करतो किंवा कार्यवाही करतो, असे पोलिसांकडून सांगितले जाते. प्रत्यक्षात पोलिस प्रशासन यासंदर्भाने पूर्णत: उदासिन असल्याचेच दिसून येत आहे. 1 महिना झाल्यानंतरही कोणताही तपास झालेला नाही. पोलिस प्रशासन दिरंगाई करत असल्यामुळे पोलिस प्रशासनाविरोधात गावकर्यांनी अन्नत्याग आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. नापिकी आणि निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी संकटात आला आहे. अशा परिस्थितीत त्याला पशुपालन व्यवसायाचा आधार असतो. पण चोरट्यांमुळे हा व्यवसायसुद्धा संकटात आला आहे. परिणामी शेतकर्यांचे मनोधैर्य खचून ते आमहत्येस प्रवृत्त होऊ शकतात, अशी भीती शेतकरी व्यक्त करित आहेत.
पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या वणी बेलखेडा येथील शेतकर्यांनी ग्रामपंचायतसमोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले. गावातील मुकेश अलोने, आशिष पाटील, मुकेश पाटील, गुणवंत अलोने यांच्यासह अनेकजण आंदोलनात सहभागी झाले आहे. तीन दिवस होऊनही अद्याप कोणीही या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेतकर्यांमधील असंतोष वाढत आहे. मागण्या पूर्ण होईस्तोवर जीव गेला तरी माघार घेणार नाही, अशी टोकाची भूमिका गावकरी व शेतकर्यांनी घेतली आहे.
-खासदारांच्या सुचनेला केराची टोपली
याबाबत गावकर्यांनी खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्याकडेही तक्रार केली होती. तेव्हा डॉ. बोंडे यांनी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षकांना कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्यांनी यासंदर्भाने एक लेखी पत्र दिले होते. परंतू त्यालाही पोलिस प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका बाजूने शेतर्यांचे चोरीच्या घटनांमुळे नुकसान होत आहे, तर दुसरीकडे पोलिस विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे चोरांना अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात चोरीच्या घटना वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




