अमरावतीत विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला
धारदार शस्त्राने विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार

संतप्त विद्यार्थ्यांनी संशयिताला पकडून बदडले
रक्तबंबाळ विद्यार्थिनीवर तातडीने शस्त्रक्रिया
अमरावती /29 सप्टेंबर– अंजनगाव बारी मार्गावरील नामांकित महाविद्यालयात बुधवारी भरदिवसा धक्कादायक प्रकार घडला. औषधनिर्माणशास्त्राच्या द्वितीय वर्षात शिकणार्या 19 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच सहपाठ्याने दप्तरातून सुरा काढून गळ्यावर सलग वार केले. वर्गाचा तास संपल्यानंतर प्रयोगशाळेकडे जात असताना अचानक झालेल्या हल्ल्यात विद्यार्थिनीच्या गळ्याला 3 ते 4 इंच खोल जखम झाली. रक्तबंबाळ होऊन ती जागेवरच कोसळली. हल्ल्यानंतर पळून जाणार्या संशयिताचा महाविद्यालयातील दक्षता पर्यवेक्षक यादव यांनी पाठलाग करून काटेरी कुंपणाजवळ पकडले. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. गंभीर जखमी विद्यार्थिनीला तातडीने रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरासह शहरात खळबळ उडाली आहे.
महाविद्यालयात औषधनिर्माणशास्त्राचा तास संपल्यानंतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा एक गट सायकल ठेवण्याच्या जागेजवळून प्रयोगशाळेकडे निघाला होता. सर्व जण नेहमीप्रमाणे पुढे जात असतानाच 19 वर्षीय संशयिताने आपल्या दप्तराची चेन उघडली आणि त्यातून धारदार सुरा बाहेर काढला. काही कळण्याच्या आत त्याने पुढे चाललेल्या विद्यार्थिनीवर हल्ला केला. तिच्या मानेवर आणि गळ्यावर त्याने सलग वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आजूबाजूचे विद्यार्थीही काही क्षण गोंधळून गेले. वार होताच विद्यार्थिनीने मदतीसाठी आरडाओरड केली. तिच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला आणि काही क्षणांतच ती रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. घटनेमुळे महाविद्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. काही विद्यार्थ्यांनी जखमी विद्यार्थिनीच्या मदतीसाठी धाव घेतली तर काहींनी पळून जाणार्या संशयिताचा पाठलाग सुरू केला.
हल्ल्यानंतर संशयिताने महाविद्यालयाच्या परिसरातून बाहेर पडण्यासाठी काटेरी कुंपणाच्या दिशेने धाव घेतली. याच वेळी दक्षता पर्यवेक्षक यादव यांनी त्याला पळताना पाहिले. त्यांनी प्रसंगावधान राखत त्याचा पाठलाग केला आणि काटेरी कुंपणाजवळ त्याला पकडून खाली पाडले. त्याच्यामागे धावत आलेल्या संतप्त विद्यार्थ्यांनी संशयिताला चोप दिला. या प्रकाराची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयिताला विद्यार्थ्यांच्या तावडीतून बाहेर काढून ताब्यात घेतले.
जखमी विद्यार्थिनी नांदगाव खंडेश्वर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. संशयित बडनेरा येथील सिंधी छावणी परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयात धारदार सुरा घेऊन येण्यामागे त्याचा नेमका हेतू काय होता, विद्यार्थिनीवर हल्ला करण्याचे कारण काय आणि या घटनेमागे आधीपासून काही वाद होता का, याचा तपास बडनेरा पोलीस करीत आहेत. दरम्यान गंभीर जखमी विद्यार्थिनीला तातडीने रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या गळ्याला खोल जखम झाल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात येत असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.घटनेनंतर महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. धारदार सुरा दप्तरात लपवून महाविद्यालयात आणण्यात आला होता का, संशयिताने हल्ल्याचे आधीच नियोजन केले होते का आणि हल्ल्यापूर्वी त्याने कोणाशी संपर्क साधला होता का, यासह विविध बाबींची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तेथील पुरावे जमा करण्याचे काम सुरू केले आहे. न्यायवैज्ञानिक पथकानेही घटनास्थळी पाहणी केली असून प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत.
महाविद्यालयाच्या आवारात भरदिवसा विद्यार्थिनीवर झालेल्या या हल्ल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयात धारदार शस्त्र घेऊन संशयित कसा दाखल झाला, सुरक्षाव्यवस्थेत नेमकी कुठे त्रुटी राहिली आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार, याकडे आता विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. बडनेरा पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून हल्ल्याचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.
घटनेनंतर खा. डॉ. अनिल बोंडे अॅक्शन मोडवर; पोलीस आयुक्तांशी साधला संवाद
एका महाविद्यालयात तरुणीवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या गंभीर घटनेची दखल घेत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी तात्काळ पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा करत घटनेची संपूर्ण माहिती घेतली. या घटनेतील दोषींवर कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस विभागाला दिल्या. तसेच, अशा गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करणे आणि तरुण-तरुणींचे योग्य समुपदेशन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि शैक्षणिक संस्थांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाच्या परिसरात खळबळ
महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थिनीवर अचानक हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दप्तरात धारदार सुरा घेऊन संशयित महाविद्यालयात आला. हल्ल्यानंतर तो काटेरी कुंपणातून पळण्याचा प्रयत्न करीत होता. दक्षता पर्यवेक्षक यादव यांनी त्याला पकडले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याला चोप दिला आणि पोलिसांनी ताब्यात घेतले. गंभीर विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.





