ओबीसींना आता 1 रुपयात जमीन मिळणार
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

महाज्योतीसाठी 300 कोटींचा निधी
मुंबई /29 सप्टेंबर – ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, अभ्यासिका आणि सामाजिक उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी सरकारी जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर राज्य सरकारने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. महसूलमंत्री आणि ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागासह संबंधित शासकीय विभागांच्या जागा नाममात्र एक रुपया दराने उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईत झालेल्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत विविध 12 मुद्द्यांवर चर्चा झाली. ओबीसी विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांबाबत प्रलंबित प्रस्तावांना गती देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी कार्यरत असलेल्या महाज्योती संस्थेसाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याबाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावरसध्या 2026-27 मधील विविध स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण योजनांची माहिती उपलब्ध आहे. याशिवाय ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह योजना, परदेशी शिष्यवृत्ती तसेच इतर शैक्षणिक योजनांशी संबंधित प्रस्तावांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या धर्तीवर ओबीसी महामंडळाला सुविधा देण्याची मागणी केली. तसेच ‘क्रांतीज्योती महात्मा फुले समता भवन’ सुरू करण्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव पुढील बैठकीत मांडण्याची सूचना केली.
वनमंत्री गणेश नाईक यांनी शासकीय सेवेत ओबीसी समाजाचा प्रलंबित बॅकलॉग भरण्याची मागणी केली. दरम्यान, महाराष्ट्राच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक आणि निवासी योजनांची माहिती उपलब्ध आहे.





