शेतकर्यांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवा
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आढावा बैठकीत निर्देश

अकोला /20 सप्टेंबर : एलनिनो संकटामुळे पावसात खंड पडला आहे. त्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडला आहे. शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी असून, भरीव मदत करण्यात येईल. सर्व सरकारी यंत्रणांनी शेतकर्यांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवाव्यात, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे अमरावती महसूल विभागातील पीक स्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ड. आकाश फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागीय आयुक्त नयना गुंडे, कृषी आयुक्त परिमल सिंह, विभागातील खासदार, आमदार, पाचही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
या बैठकीत पाचही जिल्ह्यातील 56 तालुक्यांतील पर्जन्यमान, पावसातील खंड, पीक स्थिती, पिण्याचे पाणी, चारा आदींचा तपशीलवार आढावा घेण्यात आली. जिल्हाधिका-यांनी आपापल्या जिल्ह्यातील स्थितीबाबत सादरीकरण केले. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी निवेदन करून परिस्थिती सांगितली. अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, नितीन देशमुख, प्रकाश भारसाकळे यांनी जिल्ह्यातील परिस्थिती विशद केली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सादरीकरण केले.
कृषी मंत्री श्री. भरणे म्हणाले की, एल निनोच्या संकटामुळे पश्चिम विदर्भात सर्वत्र पर्जन्यमानात खंड, असमानता दिसून येते. सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पीकांचे नुकसान झाल आहे. शासन शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, निश्चितपणे भरीव मदत करण्यात येईल. यंत्रणांनीही शेतक-यांचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवून, त्यांना दिलासा द्यावा. मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शेतकर्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना अंमलात आणली आहे. यानंतर 2 लाखावरच्या थकित कर्जधारकांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.‘महावितरण’कडून ट्रान्सफॉर्मर वेळेत न मिळाल्याने वीजपुरवठा सुरळीत होत नाही आणि पाणी उपलब्ध असलेल्या सिंचनाची अडचण होते, अशी तक्रार अनेक लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. निरंतर योजनेतून नवे ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावेत. नादुरूस्त ट्रान्सफॉर्मर तत्काळ दुरूस्त व्हावेत. डीपी उघड्या व धोकादायक अवस्थेत असू नयेत.तिथे तत्काळ उपाययोजना करावी, असे निर्देश त्यांनी दिले.‘
फेक’ बातमीविरोधात कारवाई करणार
कुणीतरी खोडसाळपणे दुष्काळग्रस्त तालुक्यांची फेक यादी करून समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली. अशी कुठलीही यादी शासनाने अद्याप जाहीर केली नाही. कुणीही शेतकर्यांच्या भावनांशी कुणी खेळू नये. याबाबत कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असे कृषी मंत्र्यांनी सांगितले. शासन शेतकर्यांच्या पाठीशी आहे. प्रत्येक नुकसानग्रस्ताला न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
शेतीला सुरळीत वीजपुरवठा देणार
शेतात पाणी असूनही रोहित्र निकामी असल्याने पिके सुकत असल्याच्या तक्रारी बैठकीत समोर आल्या. यावर महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात. नादुरुस्त रोहित्र तत्काळ बदलून शेतीसाठी सुरळीत वीज उपलब्ध करून द्यावी. उघड्या आणि धोकादायक अवस्थेतील रोहित्रांची तातडीने दुरुस्ती करून अपघात टाळावेत, असे स्पष्ट निर्देश अधिकार्यांना देण्यात आले.





