पुण्यातील दगडूशेठ बाप्पा ‘अमरावती मंडल’ कार्यालयात विराजमान

33 व्या वर्षी बाप्पाची थाटात प्राणप्रतिष्ठा

आपली मातृभूमी कार्यालयात भाविकांची गर्दी

अमरावती/15 सप्टेंबर– पश्चिम विदर्भातील ‘दैनिक आपली मातृभूमी’ व ‘दैनिक अमरावती मंडल’ कार्यालयात यंदा सलग 33 व्या वर्षी बाप्पाचे थाटात आगमन झाले. पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीची मनमोहक मूर्ती तब्बल 700 किलोमीटरचा प्रवास करून अमरावतीत दाखल झाली. सोमवारी 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर वैदिक मंत्रांच्या जयघोषात ही स्थापना करण्यातआली. माजी मंत्री तथा आ. प्रवीण पोटे पाटील यांच्यासह मुख्य संपादक अनिल अग्रवाल आणि व्यवस्थापक राजेश अग्रवाल यांनी सहकुटुंब पूजा केली. अमरावती सीए शाखेचे अध्यक्ष हर्ष शर्मा, त्यांच्या पत्नी भाविका शर्मा पूजेला हजर होत्या. राणीसती दादीजी मंदिराच्या धर्तीवर सजलेला लाल मंडप, आकर्षक रोषणाई आणि रोज सकाळ-संध्याकाळ होणार्‍या महाआरतीमुळे खापर्डे बगीचा परिसर भक्तीमय बनला आहे.
‘दैनिक आपली मातृभूमी’ व ‘दैनिक अमरावती मंडल’ कार्यालयात 33 वर्षांपासून सुरू असलेली गणेशोत्सवाची ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. अग्रवाल कुटुंबियांनी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीची देखणी प्रतिकृती आणण्याचा संकल्प केला होता. यासाठी पुण्यातील प्रसिद्ध ‘नटराज आर्ट्स’चे संचालक भालचंद्र उर्फ लालासाहेब देशमुख आणि राजेंद्र उर्फ बाबासाहेब देशमुख यांनी ही सुबक मूर्ती साकारली. मूर्ती अमरावतीत सुखरूप आणण्याची जबाबदारी श्रीनाथ ट्रॅव्हल्सचे लालाजी श्रीमाली यांनी सांभाळली. त्यांनी खास वाहन उपलब्ध करून दिले. बबलू गायकवाड यांच्यासह कार्यालयातील चार जणांचे पथक पुण्याला गेले होते. देशमुख बंधूंनी 700 किलोमीटरच्या लांब प्रवासात मूर्तीला जराही धक्का लागू नये म्हणून विशेष काळजी घेतली. सोमवारी ही मूर्ती अमरावतीत आणून विधिवत स्थापित करण्यात आली.
या पूजेला अग्रवाल परिवारातील ऋषी अग्रवाल, प्रणय अग्रवाल, अमन अग्रवाल, महीप अग्रवाल यांच्यासह ‘दैनिक आपली मातृभूमी’ व ‘दैनिक अमरावती मंडल’चे संपादकीय सहकारी आणि सँड अँड स्टोनचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयात बाप्पाच्या स्वागतासाठी खास मंदिर उभारण्यात आले. शुभारंभ इव्हेंट्सचे पीयुष लढ्ढा, पुनीत लढ्ढा यांनी लाल कापड आणि सोनेरी पत्र्यांवर लाल त्रिशूळ साकारून देखणा मंडप तयार केला. साहेबराव लाईटिंगचे राजूभाऊ ईसर यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारी रोषणाई केली. श्याम फ्लॉवर आर्टचे श्याम पीडियार यांनी फुलांची सुंदर आरास सजवली.
राधाकृष्ण मंदिराचे पुरोहित पं. संजय पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली पं. चंद्रमौली पाण्डेय हे रोज सकाळ-संध्याकाळ मनोभावे पूजा आणि आरती करत आहेत. बाप्पाला दररोज मोदकांसह वेगवेगळ्या मिष्टान्नांचा नैवेद्य दाखवला जात असून भक्तांना गोड प्रसादाचे वाटप होत आहे. वृत्तपत्र कार्यालयात अशा प्रकारे पुण्याहून खास दगडूशेठ बाप्पांची प्रतिकृती आणून उत्सव साजरा करण्याचा हा अमरावतीमधील पहिलाच उपक्रम ठरला आहे.
भव्य तयारी अन् आकर्षक रोषणाई -कार्यालयात उभारलेला देखणा मंडप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पीयुष लढ्ढा, पुनीत लढ्ढा यांच्या संकल्पनेतून लाल रंगाच्या कापडावर सोनेरी पत्रे लावून त्रिशूळ कोरलेला मंडप साकारला. राजूभाऊ ईसर यांनी रंगीबेरंगी दिव्यांची आरास केली, तर श्याम पीडियार यांनी ताज्या फुलांची सजावट केली. दररोज पं. संजय पाण्डेय आणि पं. चंद्रमौली पाण्डेय यांच्या हस्ते विधीवत पूजा होत असून भाविकांना महाप्रसाद वाटण्यात येत आहे.

Back to top button