जिल्हाधिकार्‍यांकडून मोर्शी तालुक्यातील खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी

अमरावती/15सप्टेंबर : मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई महसूल मंडळातील नेर भाग-2 परिसरात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन खरीप हंगामातील विविध पिकांच्या सद्यस्थितीची पाहणी केली. या दौर्‍या दरम्यान त्यांनी स्थानिक शेतकर्‍यांशी थेट संवाद साधून पिकांच्या वाढीबाबत सविस्तर माहिती घेतली.
दौर्‍याच्या सुरुवातीला जिल्हाधिकार्‍यांनी बाळा कीर्तकर यांच्या शेतातील कपाशी पिकाची पाहणी केली. या परिसरात पडलेल्या पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे यावेळी दिसून आले. त्यानंतर रखमाबाई संभे आणि सुखदेव खवले यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची त्यांनी पाहणी केली.या शेतांमध्ये सोयाबीनला शेंगांचे प्रमाण तुलनेने कमी असून, काही शेंगांमध्ये दाणे पूर्णपणे भरले नसल्याचे चित्र समोर आले.रमेश खवले यांच्या शेतातील बागायती कपाशीची पाहणी केली असता, हे पीक मात्र समाधानकारक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी उपस्थित कृषी अधिकार्‍यांकडून पिकांची सद्यस्थिती, उपलब्ध पर्जन्यमान, पावसाच्या खंडाचा पिकांवर झालेला परिणाम आणि शेतकर्‍यांना कृषी विभागामार्फत देण्यात येत असलेले तांत्रिक मार्गदर्शन याबाबींची सविस्तर माहिती घेतली. तसेच उपस्थित शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेत, त्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.या पाहणी दौर्‍याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, उपविभागीय कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर तसेच तालुका कृषी अधिकारी प्रथमेश माने उपस्थित होते.

Back to top button