अकोला बस स्थानकावर चोरट्यास अटक

अकोला/13 सप्टेंबर- स्थानिक सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या बस स्थानकातील पाकीट चोरीतील गुन्ह्याच्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले. सदर गुन्ह्यातील फिर्यादी आत्माराम ज्ञानेश्वर ब्राह्मण वय 49 वर्ष, रा. रवी नगर, सुधीर कॉलनी यांनी सिविल लाईन पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली की फिर्यादी हे 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी बस स्थानकावर बसची वाट पाहत असताना त्यांच्या खिशातील सुमारे 50,000/- रुपये रोख रक्कम असलेले पाकीट अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यावरून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासा दरम्यान गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी शेख वकील शेख हाफिज वय 25 वर्ष, रा. रऊफ नगर, सोहेल टावर अकोला यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता चौकशी दरम्यान त्याने सदर चोरीची कबुली दिली. आरोपीच्या अंग झडती दरम्यान चोरी गेलेल्या रकमेपैकी 38,500 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अकोला करीत आहे. सदरची कारवाई अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, एस डी पी ओ सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मालती कायदे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ यादव तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.





