आरटीओ विभागाला कॅमेरे मिळाले मात्र वापरण्याची प्रतीक्षा
15 कॅमेरे धूळ खात, कर्मचार्यांना प्रशिक्षण केव्हा?

नोंदणीमुळे वाहन तपासणीतील गैरप्रकारांवर येणार आळा
अमरावती /11 सप्टेंबर- वाहन तपासणीच्या वेळी होणारे वाद, गैरप्रकार आणि अधिकार्यांच्या कारवाईबाबत पारदर्शकता राहावी, यासाठी अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयाला पंधरा अंगावर लावता येणारे ध्वनीचित्र नोंदणी कॅमेरे देण्यात आले आहेत. मात्र हे कॅमेरे वापरण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि स्पष्ट कार्यपद्धती अद्याप मिळालेली नसल्याने आधुनिक व्यवस्था सध्या बंदच पडून आहे. कॅमेरे मिळूनही त्यांचा प्रत्यक्ष वापर कधी सुरू होणार, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने वाहन तपासणीदरम्यान अधिकारी आणि वाहनचालकांमध्ये होणारे वाद कमी करण्यासाठी तसेच कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी ही व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. मात्र कॅमेरा नेमका कोणत्या वेळी सुरू करायचा, किती वेळ नोंद ठेवायची, नोंदवलेली माहिती किती दिवस जतन करायची आणि ती कोणत्या अधिकार्याकडे पाठवायची, याबाबत अद्याप स्पष्ट सूचना मिळालेल्या नाहीत. रस्त्यावर वाहन तपासणी करणार्या पथकातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना हे कॅमेरे वापरता येणार आहेत. तपासणीदरम्यान अधिकार्यांची कारवाई, वाहनचालकांचे वर्तन तसेच दोन्ही बाजूंतील संभाषणाची ध्वनीचित्र नोंद होणार आहे. त्यामुळे कारवाईवर आक्षेप किंवा गैरवर्तनाचे आरोप झाल्यास वस्तुस्थिती समोर आणण्यास मदत होऊ शकते. कॅमेर्यांचा वापर, त्यांची नोंद सुरू-बंद करण्याची पद्धत, ध्वनीचित्र सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आणि नोंदवलेली माहिती कोणाकडे जमा करायची, याचे प्रशिक्षण अद्याप झालेले नाही. यामुळे तांत्रिक अडचणीही निर्माण होत आहेत. अमरावती प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कार्यालयाला पंधरा कॅमेरे मिळाल्याची माहिती दिली. वरिष्ठ कार्यालयाकडून प्रशिक्षणाचे वेळापत्रक मिळाल्यानंतर संबंधित अधिकार्यांना प्रशिक्षण देऊन कॅमेर्यांचा वापर सुरू करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.





