राजकमल, इतवारा उड्डाणपुलाचे काम त्वरीत मार्गी लावा

डॉ. सुनिल देशमुख यांची बांधकाम मंत्र्यांकडे मागणी

भोसले यांनी घेतली रखडलेल्या कामांची गंभीर दखल

देशमुखांच्या पाठपुराव्याला मिळाला विकास कामाला वेग

अमरावती/11 सप्टेंबर– शहरातील वाढती वाहतूक आणि रखडलेल्या विकासकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन इतवारा बाजार उड्डाणपूल आणि राजकमल चौकाजवळील रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. दोन्ही कामे अनेक वर्षांपासून रखडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
डॉ. सुनील देशमुख यांनी अमरावती शहर व जिल्ह्यातील रस्ते आणि रखडलेल्या विकासकामांची माहिती मंत्री भोसले यांना दिली. इटवारा बाजार उड्डाणपुलाचे काम गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राजकमल चौकाजवळील रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचे कामही लवकर सुरू करण्याची गरज त्यांनी मांडली. शहरातील वाढती वाहनांची गर्दी आणि वाहतुकीचा ताण पाहता दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मागणीची गंभीर दखल घेत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांना दोन्ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांना आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही उड्डाणपूल पूर्ण झाल्यास इटवारा बाजार, राजकमल चौक आणि रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून, देशमुखांच्या पाठपुराव्याला मंत्र्यांच्या निर्देशांची जोड मिळाल्याने अमरावतीकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

Back to top button