गणेश विसर्जनासाठी अचलपूर सज्ज

मिरवणूक मार्गावर ‘रूट मार्च’ करून प्रशासन सतर्क

अचलपूर /11 सप्टेंबर : आगामी गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणुका शांततापूर्ण, सुरक्षित आणि कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पडाव्यात, यासाठी अचलपूर पोलिस व विविध प्रशासकीय विभागांनी संयुक्तपणे मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून ‘रूट ऑडिट’ केले. रस्त्यांवरील खड्डे, झाडांच्या धोकादायक फांद्या, लोंबकळणार्‍या विद्युत तारा तसेच संवेदनशील भागातील सुरक्षा व्यवस्थेचा यावेळी बारकाईने आढावा घेण्यात आला.
दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी पोलीस अधीक्षक निकेतन कदम व अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद यांच्या नेतृत्वात ही पाहणी मोहीम राबविण्यात आली.अचलपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार पोलीस निरीक्षक कैलास भगत यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार, तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी अमोल बोकळे, महावितरणचे कर्मचारी शुभम वानखडे तसेच अचलपूर नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील सलीम खान आणि उपअभियंता मनीष शर्मा यांनी या संयुक्त पाहणीत सहभाग घेतला.
पाहणीदरम्यान सहायक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद यांनी नगर परिषद प्रशासनाला मिरवणूक मार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे, रस्त्यालगतच्या झाडांच्या अडथळादायक फांद्या छाटणे तसेच संवेदनशील भागातील गल्ली-बोळांमध्ये आवश्यकतेनुसार बॅरिकेडिंग करण्याच्या सूचना दिल्या. धार्मिक स्थळांजवळून मिरवणूक जात असताना आवश्यक त्या समन्वयातून खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबतही संबंधित विभागांचे लक्ष वेधण्यात आले.
महावितरणच्या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना मिरवणूक मार्गावरील लोंबकळणार्‍या व धोकादायक विद्युत तारा तातडीने व्यवस्थित करण्याचे, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची दक्षता घेण्याचे तसेच विसर्जन मिरवणुकीच्या वेळी दोन कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष उपस्थित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. बांधकाम विभागालाही रस्त्यांवरील खड्डे बुजवून मिरवणूक मार्ग सुरक्षित करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.

Back to top button