हैद्राबादहून परतत असलेल्या दोघांचा मुर्तिजापूर नजीक अपघाती मृत्यू
एक झटामझिरी तर दुसरा मोठी भेंमडी येथील रहिवाशी : तालुक्यात शोक

वरुड /10 सप्टेंबर– तेलांगणाच्या हैद्राबादमध्ये मजुरीसाठी गेलेल्या तालुक्यातील दोन युवकांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्हयाच्या मुर्तिजापुर नजीक घडल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ऐन पोळयाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ माजली असून एक युवक झटामझिरी येथील तर दुसरा मोठी भेंमडी येथील रहिवाशी आहे. या प्रकरणी मुर्तिजापुर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असुन हा अपघात नेमका घडला तरी कसा? याबाबत वृत्त लिहीस्तोवर माहीती मिळु शकली नाही.
प्राप्त माहीतीनुसार, वरुड तालुक्यातील विविध गावातील विशेष म्हणजे आदिवाशी बहुल भागातील युवक आणि युवती हैद्राबाद येथे मजुरीसाठी सतत ये-जा करीत असतात. वरुडहून थेट हैद्राबाद येथे जाण्याकरीता रेल्वेची व्यवस्था असल्यामुळे मोठया प्रमाणात मजुर पोटाची खळगी भरण्याकरीता जात असतात. मोठी भेंमडी कुणाल हरिदास आहाके (17) व झटामझिरी येथील कैलास देवराव धुर्वे (32) यांच्यासह काही मजुरी काही दिवसांपुर्वी हैद्राबाद येथे गेले होते.
पुढे असलेल्या पोळा सणाच्या उददेशाने गेल्या मंगळवारी या दोघांसहीत काही मजुर काचीगुडा-नरखेड एक्सप्रेसने वरुडकडे येण्यासाठी निघाले. सकाळी 7.10 च्या सुमारास ही रेल्वे काचीगुडा रेल्वेस्टेशन वरुन वरुडकडे येण्यासाठी निघाली. त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास ही रेल्वे मुर्तिजापुरला पोहचत असतांना कुणाल आणि कैलास हे दोघेही रेल्वेतुन खाली पडल्याचे सांगितले जात आहे. रात्रीची घटना असल्यामुळे ते दोघे रेल्वे ट्रॅकवर पडले राहले, सकाळच्या सुमारास दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर रेल्वे पोलिसांना माहीती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करुन दोघांचेही मृतदेह शवविच्छेदन गृहात रवाना केले. दोघांचीही ओळख पटत नसल्यामुळे मोठया प्रयत्नाने हे दोघे वरुड तालुक्यातील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुर्तिजापुर पोलिसांनी वरुड तालुक्यात संपर्क केला असता त्यातील एक कैलास देवराव धुर्वे (32) रा.झटामझिरी तर दुसरा भेंमडी कुणाल हरिदास आहाके (17) रा.मोठी भेंमडी येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. आज दुपारच्या सुमारास दोन्ही मृतकांचे नातेवाईक मुर्तिजापुरकडे रवाना झाले. ओळख परेड झाल्यानंतर दोघांचेही शवविच्छेदन पार पडले. रात्री उशिराच्या सुमारास दोघांचेही मृतदेह आपआपल्या गावी आणुन त्यांचेवर अंत्यंस्कार करण्यात येणार आहे. वृत्त लिहीस्तोवर हा अपघात नेमका कसा घडला? याबाबत माहीती मिळु शकली नाही. ऐन पोळयाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे.





