अमरावतीच्या विद्यार्थ्याचा नागपुरात दुर्दैवी मृत्यू

पत्रातील मजकुराने कुटुंबीय हळहळले

बहिणीच्या शिक्षणाची चिंता केली व्यक्त

अमरावती/10 सप्टेंबर – अंजनगाव सुर्जी येथील प्रथमेश विजय गुजर या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा नागपुरातील श्रीकृष्णनगर परिसरात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. प्रथमेश हा केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. काही दिवसांपासून तो अस्वस्थ असल्याची माहिती प्राथमिक पोलिस तपासात समोर आली आहे.
प्रथमेश श्रीकृष्णनगर परिसरातील भाड्याच्या खोलीत राहत होता. बुधवारी सकाळी त्याला डबा देण्यासाठी गेलेल्या युवकाला खोलीतून प्रतिसाद मिळाला नाही. त्याने घरमालकिणीला माहिती दिल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात प्रथमेशने काही मित्रांशी मनातील चिंता व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या मागे ठेवलेल्या पत्रात आजी, आई-वडिलांची माफी मागण्यात आली असून लहान बहिणीच्या शिक्षणाची काळजी व्यक्त करण्यात आली होती. बहिणीला चांगले शिक्षण मिळावे आणि तिच्या भविष्यासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती.या घटनेमुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे. प्रथमेशच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नंदनवन पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबीय आणि मित्रांकडून माहिती घेतली जात असून तपासातून घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे

Back to top button