पूर्णा नदीत बुडून युवकाचा मृत्यू

मित्रांसोबत पोहण्यासाठी जाणे जीवावर बेतले

दर्यापूर /10 सप्टेंबर– कुकसा येथील पूर्णा नदीपात्रात मित्रांसोबत दुपारी पोहण्यासाठी गेलेल्या कळाशी गावातील अमित संतोष तायडे या सतरा वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून करुण अंत झाला. घटनेनंतर मित्रांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली. माहिती मिळताच स्थानिक पोलीस व जिल्हा आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी नदीपात्रात धाव घेऊन पाच तास शोधमोहीम राबवत अखेर सायंकाळी अमितचा मृतदेह बाहेर काढला.
दुपारच्या कडक उन्हात मित्रांसोबत नदीवर पोहायला जाणे कळाशी येथील एका सतरा वर्षांच्या कोवळ्या मुलाच्या जीवावर बेतल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. कळाशी येथील रहिवासी असलेला अमित संतोष तायडे हा दुपारच्या सुमारास आपल्या काही सवंगड्यांसोबत कुकसा गावच्या शिवारातील पूर्णा नदीवर आंघोळीसाठी गेला होता. सर्व मित्र पाण्यात उतरून पोहण्याचा आनंद घेत असताना अमितनेही पात्रात उडी घेतली. मात्र पाण्याचा डोह कितीखोल आहे याचा त्याला बिलकूल अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात ओढला गेला.काही क्षणातच अमित गटांगळ्या खाऊ लागल्याचे पाहून काठावर व पाण्यात असणार्‍या मित्रांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांनी त्याला वाचवण्यासाठी एकच आरडाओरड केली. नदीकाठच्या काही लोकांनी तत्काळ धाव घेतली पण तोपर्यंत अमित खोल पाण्यात दिसेनासा झाला होता. मुलांनी तात्काळ गावात खबर दिली. यानंतर पोलीस प्रशासनाला कळवण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा आपत्ती निवारण पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
पथकातील जवानांनी बोट व गळ टाकून डोहाच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली. नदीत सलग पाच तास चाललेल्या प्रयत्नांनंतर सायंकाळी जवानांना अमितचा मृतदेह हाती लागला. घटनास्थळी पोलीस पाटील, तलाठी, पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी रवाना केला. या घटनेने कळाशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अमितचा सायंकाळी मृतदेह गवसला -दुपारी एकच्या सुमारास अमित बुडाल्यानंतर कुकसा नदीपात्रात ग्रामस्थांनी एकच धाव घेतली. पाण्याच्या डोहात शोध घेणे कठीण बनल्याने जिल्हा आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले. पथकातील शूर जवानांनी सलग पाच तास डोहाच्या पाण्यात शोध घेतला. अखेर सायंकाळी अमितचा मृतदेह गवसला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले.

Back to top button