अकरावीची कट ऑफ लिस्ट 30 जूनला?

यादीचा घोळ अजूनही सुरूच

-संकेतस्थळात तांत्रिक बिघाड
मुंबई / 26 जून: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या प्रवेश यादी (कट ऑफ लिस्ट)चा घोळ अजूनही सुरू आहे. विद्यार्थ्यांना वाटप झालेल्या महाविद्यालयांची यादी आज (26 जून) जाहीर होणार होती. मात्र शिक्षण विभागाच्या संकेतस्थळात सहाव्यांदा तांत्रिक बिघाड झाल्याने प्रक्रिया पुन्हा ठप्प झाली. त्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी संकेतस्थळाला भेट देऊन यादीचा शोध घेत होते. परंतु यादीबाबत त्यांना कुठलीही अधिकृत माहिती देण्याची साधी तसदीही शिक्षण संचालनालयाने घेतली नाही. प्रवेश यादी पुढे ढकलल्याची कोणतीही अधिकृत सूचना प्रसिद्ध न झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दिवसभर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. ही यादी आता 30 जून रोजी जाहीर होईल, असे समजते. शिक्षण खात्याच्या या अनागोंदी कारभारामुळे राज्यातील साडेबारा लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल दरवर्षीच्या तुलनेत 15 दिवस आधी जाहीर करूनही विद्यार्थ्यांना त्याचा काहीच फायदा झालेला नाही. आज अकरावीच्या पहिल्या प्रवेश यादीअंतर्गत विद्यार्थ्यांना वाटप झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर होणार होती. विद्यार्थ्यांसह पालक, माध्यमिक शाळांचे प्राचार्य व शिक्षकही सकाळपासून या यादीच्या प्रतीक्षेत होते. उत्सुकतेपोटी लाखो विद्यार्थी आणि पालक शिक्षण विभागाचे संकेतस्थळ तपासत होते. मात्र, संध्याकाळ झाली तरी संकेतस्थळावर यादीचा थांगपत्ता नसल्याने सगळ्यांची मोठी निराशा झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थी कैक किमी लांब पायपीट करून शाळांमध्ये ताटळकले होते. अशा सर्वांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून यादीबाबत कुठलेही उत्तर न मिळाल्याने माघारी परतावे लागले.
अकरावी प्रवेशाची पहिली निवड यादी कधी जाहीर होईल, याबाबतची माहिती शुक्रवारी (27 जून) संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शिक्षण संचालनालयाकडून जाहीर होईल, असे समजते. निवड यादी संदर्भात तांत्रिक टीम आणि शिक्षण विभागातील अधिकारी काम करत आहेत. हे काम पूर्ण झाले तर यादी दुसर्याच दिवशी जाहीर होईल, अन्यथा 30 जून रोजी यादी प्रसिद्ध होईल, अशी शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Back to top button