ग्रा.पं.कार्यालयात महिलेला मारहाण झाल्याने खळबळ
जातिवाचक शिवीगाळ केल्याचा संतापजनक आरोप

अचलपूर /28 ऑगस्ट : जनतेच्या तक्रारी ऐकून त्यांना न्याय देण्यासाठी आयोजित केलेल्या तक्रार निवारण शिबिरातच एका महिलेचा छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अचलपूर तालुक्यातील कविठा बु. येथील ग्रामपंचायत कार्यालयात 28 जुलै 2026 रोजी हा प्रकार घडल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. सर्वांसमक्ष मारहाण, जातिवाचक शिवीगाळ आणि कपडे काढण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याने या घटनेने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच संतप्त सवाल उपस्थित केले आहेत.
तक्रार निवारण शिबिर म्हणजे नागरिकांना आपली व्यथा मांडण्यासाठी मिळणारे व्यासपीठ. मात्र, याच ठिकाणी महिलेचा अपमान आणि मारहाण झाल्याचा आरोप होत असेल तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, शिबिरादरम्यान गावातील काही व्यक्तींनी तिच्याशी अश्लील तसेच जातिवाचक शब्दांत शिवीगाळ केली. त्यानंतर तिच्यावर मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याचाही गंभीर आरोप तिने केला आहे. या प्रकरणी चार व्यक्तींविरुद्ध नावाने तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करताना काहीआरोपींची नावे वगळण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. त्यामुळे तक्रारीतील सर्व आरोपींची नावे, घटनास्थळी उपस्थित व्यक्ती, प्रत्यक्षदर्शी आणि उपलब्ध पुरावे यांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. पीडित महिलेने पुढे निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. जातिवाचक शिवीगाळीचा आरोप सिद्ध होत असल्यास अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करावी, संबंधित आरोपींवर कायद्यानुसार कठोर गुन्हे दाखल करावेत आणि पीडितेला संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष विनोद नरवाळे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. महिलेवर ग्रामपंचायत कार्यालयासारख्या सार्वजनिक ठिकाणी मारहाण, जातिवाचक शिवीगाळ आणि विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. हा प्रकार केवळ एका महिलेवरील अन्याय नसून संविधानिक मूल्ये, कायदा आणि सामाजिक न्यायव्यवस्थेवर झालेला हल्ला आहे. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्व आरोपींविरुद्ध तातडीने आणि निष्पक्षपणे कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.




