‘मागासवर्गीय असल्याने माझ्या अधिकारांचं हनन’

-खा. बळवंत वानखडेंचा बच्चू कडूंवर आरोप

-अनूसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार
-जिल्हा बँकेच्या पदाधिकार्‍यांवर कारवाईची मागणी
अमरावती / 26 जून: मागासवर्गीय असल्याने माझ्या अधिकारांचे हनन करण्यात आले आहे, असा गंभीर आरोप अमरावती लोकसभेचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे. प्रहारचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री आणि अमरावती बच्चू कडू यांच्यावर अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कारभाराच्या अनूषंगाने त्यांनी हा आरोप केला आहे. वानखडे यांनी कडूंविरोधात थेट महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अनागोंदी कारभाराचा पाढा वाचला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बच्चू कडू जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाल्यानंतर बँकेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. अशात अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे प्रहारचे प्रमुख बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संघटक आणि बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांची तक्रार केल्याने सहकार क्षेत्रातील राजकारण आणखीन तापल्याचे पाहायला मिळत आहे. या तक्रारीत वानखडे यांनी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कसा अनागोंदी कारभार सुरू आहे, यावरून ताशेरे ओढले आहेत.
खासदार वानखेडे यांनी पत्रात म्हटलं आहे की, अमरावती जिल्हा बँकेच्या अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून मी निवडून आलो आहे. मी बँकेचा विद्यमान संचालक आहे. बँकेच्या कामकाजात सहभागी होण्याचे अधिकार असतानाही मला अध्यक्ष, उपाध्यक्ष स्वाक्षरी करू देत नाहीत. मागासवर्गीय असल्याने माझ्या अधिकाराचं हनन केलं जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.
कायदा डावलून बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी समित्या स्थापन केल्या. मी मागासवर्गीय संचालक असल्याने मला कुठल्याही समितीवर घेण्यात आलं नाही असा आरोपही वानखेडे यांचा आहे. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सात सहकारी संचालक यांनी खोटे प्रोसेडिंग लिहून करोडो रुपयांचा गैर व्यवहार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दहा-बारा वर्षापासून नफ्यात असलेली बँक, भ्रष्टाचारामुळे तोट्यात आली आहे, निबंधक कार्यालयाची दखल घेत नाही असं ही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

Back to top button