यकृत, कर्करोगाच्या आधुनिक उपचारांवर अमरावतीत मंथन
अमरावतीत निमाचा उपक्रम; तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अमरावती /26 ऑगस्ट : वैद्यकीय क्षेत्रातील वेगाने बदलणारे तंत्रज्ञान, आधुनिक निदान पद्धती आणि सुपरस्पेशालिटी उपचारांची अद्ययावत माहिती डॉक्टरांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), अमरावती शाखेच्या वतीने कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन संस्थेच्या सहकार्याने हॉटेल रंगोली पर्ल येथे विशेष वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमाचे (सीएमई) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात यकृतविकार, हाडे व मऊ उतींचे आजार तसेच फुफ्फुसाचा कर्करोग या गंभीर आजारांवरील आधुनिक उपचारांवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या पहिल्या वैज्ञानिक सत्रात यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राजन गर्ग यांनी बालकांपासून प्रौढांपर्यंत आढळणार्या यकृताच्या आजारांवर प्रकाश टाकला. प्राथमिक स्तरावरच आजाराची लक्षणे ओळखून रुग्णाला वेळेवर तज्ज्ञांकडे पाठवल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसर्या सत्रात ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी तज्ज्ञ डॉ. मनित गुंडव्हडा यांनी हाडे आणि मऊ उतींमधील गाठी, सूज व वेदनांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला. कर्करोगाच्या संशयास्पद लक्षणांचे वेळेत मूल्यमापन करून पुढील तपासण्या करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तिसर्या सत्रात मुंबई येथील फुफ्फुसाच्या कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. मनीष जेठानी यांनी या आजारातील आधुनिक निदान व उपचारांच्या नव्या पर्यायांची माहिती दिली. या वैद्यकीय उपक्रमामुळे प्राथमिक स्तरावर काम करणार्या डॉक्टरांना गंभीर लक्षणांची वेळेत ओळख पटवून योग्य उपचार देण्यास मोठी मदत होणार आहे. या कार्यक्रमास अमरावती शहर व परिसरातील भारतीय चिकित्सा पद्धतीतील वैद्यकीय तज्ज्ञ आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला निमाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण औगड, मध्यवर्ती संयुक्त सचिव डॉ. विजय अजमिरे, समन्वयक डॉ. कमल राऊत, महाराष्ट्र समन्वयक डॉ. आशिष येवतकर, आयुर्वेद फोरम महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अमोल ठवळी, टीचर फोरम अमरावतीचे अध्यक्ष डॉ. यशवंत वानखडे, वुमेन्स फोरम अमरावतीच्या अध्यक्ष डॉ. प्रेमा चौधरी, आयुर्वेद फोरम अमरावतीचे अध्यक्ष डॉ. उन्मेष दालके आणि स्टुडंट्स फोरम अमरावतीचे अध्यक्ष अंकित कात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.




