दुष्काळग्रस्तांसाठी शिंदे सेनेचा आनंदाचा शिधा
राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा

मुंबई /15 ऑक्टोबर : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि संकटात सापडलेल्या जनतेला मदतीचा हात देण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षाने यंदाचा दसरा मेळावा समर्पित केला आहे. गोरेगाव येथील नेस्को संकुलात सायंकाळी पाच वाजता होणार्या या मेळाव्यातून दुष्काळग्रस्त भागातील जनतेला मदत करण्यासाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणार्या या मेळाव्याच्या माध्यमातून पक्षाने शेतकर्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिला जाणार आहे. गुरुवारी पक्षाकडून मेळाव्याचा चित्रफितीच्या स्वरूपातील टिझर प्रसिद्ध करण्यात आला.
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पाणीटंचाई, शेतीतील घटते उत्पन्न आणि वाढत्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना आधार देण्याची भूमिका शिवसेना शिंदे पक्षाने घेतली आहे. शेतकर्यांना संकटात वार्यावर सोडणार नाही, शिवसैनिक भगवा खांद्यावर घेऊन शेताच्या बांधावर पोहोचतील. शेतकर्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा संदेश टिझरमधून देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात राजकीय भाषणांबरोबरच दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा कृती कार्यक्रम जाहीर होणार आहे.





