राज्य महोत्सव गणेशोत्सवाच्या स्पर्धेत अधिकाधिक गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा
विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे आवाहन

अमरावती /25 ऑगस्ट: महाराष्ट्राचा लाडका लोकउत्सव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता ’राज्योत्सव’ म्हणून धुमधडाक्यात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 17 ऑगस्ट 2026 रोजी ’उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा’ जाहीर केली आहे. या भव्य उपक्रमात अमरावती विभागातील जास्तीत जास्त गणेशमंडळांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे. यंदाची ही स्पर्धा केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित नसून तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक व पात्र मंडळांना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या ganeshostav. pldmka.co. ळप या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन येत्या 7 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. या स्पर्धेत केवळ अधिकृतरीत्या नोंदणीकृत अथवा परवानाधारक गणेशोत्सव मंडळांनाच प्रवेश मिळणार आहे. नव्या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष अट घालण्यात आली आहे. त्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या मागे सलग दोन वर्षे राज्य किंवा जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय वा तृतीय पारितोषिक मिळालेल्या मंडळांना यंदाच्या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. ही अट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंडळांसाठीही लागू राहील. तसेच मंडळांनी गणेशोत्सवासाठी केलेल्या सामाजिक व सांस्कृतिक कामाचा कालावधी हा मागील अनंत चतुर्दशीपासून ते चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंत गृहीत धरला जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. तालुका पातळीवर प्रथम क्रमांकास 25 हजार रुपये, तर जिल्हा स्तरावर अनुक्रमे 50 हजार, 40 हजार आणि 30 हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकासाठी तब्बल 7 लाख 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 5 लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 2 लाख 50 हजार रुपयांचे भरघोस रोख पारितोषिक मिळणार आहे. याशिवाय राज्यस्तरीय निवडीत राहिलेल्या उर्वरित 33 जिल्हास्तरीय प्रथम विजेत्या मंडळांना प्रत्येकी 50 हजार रुपये व सन्मानपत्र देऊन गौरवले जाईल. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, आकर्षक सजावट, कला व संस्कृतीचे जतन, सामाजिक उपक्रम आणि मंडळात महिलांचा किमान 30 टक्के सहभाग यांसारख्या 100 गुणांच्या निकषांवर मंडळांचे मूल्यमापन केले जाईल. अधिक माहितीसाठी मंडळांनीwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.




