भाजप आणि युवा स्वाभिमान दहीहंडीवरून समोरासमोर

6 सप्टेंबरला राजकमल अन् नवाथे चौकात राजकीय धुमश्चक्री

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीवरून शहरात चर्चा

अमरावती /19 ऑगस्ट – आगामी 6 सप्टेंबर रोजी अमरावती शहरात दहीहंडीच्या उत्सवावरून राजकीय वातावरण प्रचंड तापले असून भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षात मोठी धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आ. रवी राणा आणि प्रवीण पोटे यांच्यात सुरू असलेला अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या काळात दोघांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र निवडणुका पार पडताच हे दोन्ही नेते पुन्हा आमनेसामने आले आहेत. यावर्षी दहीहंडीच्या माध्यमातून दोघेही आपले राजकीय वर्चस्व दाखवण्यासाठी सज्ज झाले असून यामुळे शहरात भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार तणाव निर्माण झाला आहे.युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने 6 सप्टेंबर रोजी नवाथे चौकात भव्य विदर्भस्तरीय दहीहंडीचे आयोजनकरण्यात आले आहे, तर दुसरीकडे प्रवीण पोटे यांच्या वतीने राजकमल चौकात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. विशेष म्हणजे दोन्ही आयोजकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमासाठी निंमत्रित केले असून मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आ. रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री अमरावतीत आले तर ते आधी कोणाच्या दहीहंडीला हजेरी लावणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला असून यावरून शहरात चर्चांना उधाण आले आहे.
दोन्ही प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन शहराच्या मुख्य चौकांमध्ये एकाच दिवशी होणार असल्याने अमरावतीत एक विचित्र आणि आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होणार आहे. दोन्ही बाजूंचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांना शह-काटशहा देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. येत्या काळात दहीहंडीच्या निमित्ताने राजकीय फटाके फुटणार हे आता स्पष्ट झाले आहे. पोलीस प्रशासनासाठी ही मोठी सुरक्षेची परीक्षा ठरणार असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांची मोठी कसरत होणार आहे.त्याच वेळी मुख्यमंत्र्यांसमोरही मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. त्यांनी जर आधी युवा स्वाभिमानच्या दहीहंडीला उपस्थिती लावली तर भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची आणि कार्यकर्त्यांची तीव्र नाराजी त्यांना सहन करावी लागेल.
सध्या भाजपमध्ये दोन गट पडले असून एक गट राणा दांपत्याच्या पाठीशी उभा आहे, तर दुसरा गट त्यांना कडवा विरोध करत आहे. अशा वेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकाच दिवशी दोन्ही ठिकाणी कसे पोहोचायचे, असा मोठा पेच पडला आहे.या दहीहंडीच्या माध्यमातून शहरात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे. अमरावती शहरावर आपलेच वर्चस्व आहे हे सिद्ध करण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू असल्याचे नागरिक बोलत आहेत. एकीकडे आ. रवी राणा हे तुफान गर्दी जमवण्यात नेहमीच पटाईत मानले जातात, तर दुसरीकडे प्रवीण पोटेसुद्धा आपली ताकद दाखवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. 6 सप्टेंबरला शहरात राजकीय मटकी नक्की कोणाची फुटणार आणि कोण बाजी मारणार, याकडे आता संपूर्ण अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

पॉलिटिकल पहिली मटकी कुणाची फुटणार?
अमरावतीत 6 सप्टेंबरला रंगणार्‍या या दहीहंडी उत्सवात आ. रवी राणा आणि प्रवीण पोटे यांच्यात राजकीय ताकद दाखवण्याची मोठी स्पर्धा लागली आहे. दोन्ही मातब्बर नेते आमनेसामने आल्याने शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पोलीस प्रशासनाची कसोटी लागणार असून मुख्यमंत्री पहिले कोणाच्या हंडीला उपस्थिती लावतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button