उन्हाळी शिबिरात चित्तथरारक कवायती

श्री हव्याप्र मंडळात पारंपारिक खेळाच्या प्रात्यक्षिकांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध

ग्रामीण पोलीस अधीक्षक कदम यांनी केले कौतुक

अमरावती/28 मे: श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ऐतिहासिक उन्हाळी शिबिरामध्ये विविध पारंपरिक आणि साहसी खेळांच्या चित्तथरारक कवायतींचे नेत्रदीपक सादरीकरण करण्यात आले. शिस्त, ताकद, कौशल्य आणि सांघिक समन्वय यांचा सुरेख संगम असलेल्या या प्रात्यक्षिकांनी उपस्थित प्रेक्षकांना अक्षरश: थक्क करून सोडले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम उपस्थित होते. शिबिर संचालक राजेश महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मंडळाच्या सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, विनोद तनवीस, शिबिर संचालक प्रा. देवानंद सावरकर, सूर्यनारायण मिश्रा तसेच अँटी करप्शन बटालियन क्राईम डिटेक्टिव्ह, दिल्लीचे मान्यवर उपस्थित होते. श्री हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रा. विलास दलाल यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या प्रशस्त मैदानावर विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. मनोज कोहळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाद्यवृंदाच्या जोशपूर्ण तालावर शिबिरार्थी खेळाडूंनी आकर्षक आणि थरारक कवायती सादर केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात शिस्तबद्ध मार्चपास्टने झाली. त्यानंतर विटा, भाला, डंबेल्स कवायती, दांडपट्टा, उर्मी, एरोबिक्स, लाठी-कवायती, पोल मल्लखांब, रोप मल्लखांब, जिम्नॅस्टिक, योगा तसेच जळत्या रिंगमधून केलेली साहसी प्रात्यक्षिके यांसह विविध खेळांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक सादरीकरणात खेळाडूंचा आत्मविश्वास, समर्पण आणि कसून सराव स्पष्टपणे दिसून येत होता. विशेष म्हणजे मंडळाच्या उन्हाळी शिबिरात सहभागी झालेल्या लहान ते मोठ्या सर्व शिबिरार्थींनी अत्यंत शिस्तबद्ध आणि समन्वयपूर्ण पद्धतीने ही प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्या कौशल्यपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. यावेळी प्रमुख अतिथी निकेतन कदम यांनी खेळाडूंचे कौतुक करताना सांगितले, आजच्या मोबाईल आणि डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी भारतीय पारंपरिक खेळांकडे वळणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. खेळामुळे शरीर सुदृढ होतेच, पण शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणही विकसित होतात. या शिबिरामधून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आयुष्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला असून भविष्यात समाज आणि देशासाठी सक्षम युवा पिढी घडेल, असा मला विश्वास वाटतो. मेहनत, चिकाटी आणि संस्कार यांच्या जोरावरच यशाचे शिखर गाठता येते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. आशिष हटेकर यांनी केले. कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्रशिक्षक, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button