शिवसेना ठाकरेंचीच, धनुष्यबाण चिन्ह गोठवा
सुप्रीम कोर्ट शिवसेनेचे चिन्ह गोठवणार?

अॅड.कपील सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
नवी दिल्ली/19 ऑगस्ट : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता देण्याच्या आणि पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह त्यांना बहाल करण्याच्या भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले आहे. याप्रकरणी मागील आठवड्यापासून सर्वोच्च न्यायालयात आज (19 ऑगस्ट) पुन्हा एकदा सुनावणी सुरू आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ‘शिवसेना हा उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे, तो एकनाथ शिंदे यांचा होऊ होऊ शकत नाही,’ असा युक्तिवाद करत धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली आहे.
सलग सातव्या दिवशी युक्तिवादाला सुरुवात करताना कपिल सिब्बल म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकारांच्या चौकटीबाहेर जाऊन शिवसेना हा राजकीय पक्ष कुणाचा याबाबतचा निर्णय दिला. तर दुसरीकडे आपल्याकडे अधिक आमदार असल्याने पक्ष आपलाच आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला. मात्र शिंदे गटाचा हा दावा तकलादू असून आमदारांचा एखादा वेगळा गट तयार झाला, तर तो दुसर्या पक्षात विलीन होऊ शकतो, असा गट आपणच खरा पक्ष असल्याचा दावा करू शकत नाही, असा युक्तिवाद करत कपिल सिब्बल यांनी विधिमंडळ पक्षाची कालमर्यादाही यावेळी स्पष्ट केली.
कपिल सिब्बल म्हणाले की, विधिमंडळ पक्ष हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो आणि आमदारांच्या निवडून आलेल्या कार्यकाळापुरतं विधिमंडळ पक्षाचं अस्तित्व असतं. मग आमदार असो वा नसो राजकीय पक्ष हा निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असतो. तसेच राजकीय पक्षाचं नेतृत्व कुणाकडे आहे, याचीही नोंद निवडणूक आयोगाकडे असते. तसेच दहाव्या सूचीनुसार विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नसतो. कारण राजकीय पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो, असाही युक्तिवाद सिब्बल यांनी केला.




