अमरावतीच्या पोलीस कर्मचार्‍याची तिरंग्याला अनोखी सलामी

1 मिनिट 16 सेकंद श्वास रोखून चालवली अंडरवॉटर सायकल

10 फूट खोल पाण्यात विना ऑक्सिजन 25 मीटर सायकलिंग
जागतिक विक्रमासाठी प्रवीण आखरे यांची जोरदार तयारी

अमरावती /16 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिनाचा उत्साह चौफेर ओसंडून वाहत असताना अमरावतीच्या एका पोलीस कर्मचार्‍याने थेट पाण्याच्या खाली जाऊन तिरंग्याला दिलेली अनोखी सलामी सध्या शहरभरात कौतुकाचा विषय ठरली आहे. केंद्रीय तसेच राज्य सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला दाद देत अमरावती पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण आखरे यांनी स्विमिंग पूलमध्ये तब्बल 10 फूट खोल पाण्यात जाऊन विना ऑक्सिजन 1 मिनिट 16 सेकंद श्वास रोखून 25 मीटर सायकल चालवली आणि देशाच्या आन-बान-शानाचा ध्वज फडकवला. अद्याप कोणालाही सहज न जमणारा हा थरारक प्रताप पाहणार्‍यांचे डोळे विस्फारले असून, अडीच महिन्यांच्या कठोर सरावाच्या बळावर प्रवीण आखरे यांनी हा कठीण टप्पा पार केला आहे.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून काहीतरी वेगळं आणि देशाला अभिमान वाटेल असं करण्याचे स्वप्न प्रवीण आखरे यांनी उराशी बाळगलं होतं. त्यासाठी त्यांनी स्थानिक स्विमिंग टँकमध्ये सलग अडीच महिने रोज घाम गाळला. अंगावर पोलीस गणवेश, डोक्यावर हेल्मेट आणि हातात तिरंगा घेतलेल्या सायकलसह त्यांनी पाण्याच्या तळाशी झेप घेतली. श्वास रोखून धरणे आणि पाण्याच्या प्रचंड दाबात सायकलचे पॅडल मारणे अत्यंत धोक्याचे असतानाही प्रवीण यांनी 25 मीटरचेअंतर सहज पार केले.या धाडसी कामगिरीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी प्रवीण आखरे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. सध्या 25 मीटरचा टप्पा पूर्ण झाला असला तरी थांबणे त्यांच्या रक्तात नाही. येत्या काळात 35 ते 40 मीटर अंतर पाण्याखाली पार करून हा विक्रम थेट ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्याचा मानस प्रवीण आखरे यांनी व्यक्त केला आहे. अमरावतीच्या या खाकीतल्या वीराचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button