अमरावतीत जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांची हेळसांड
मनपा आयुक्तांना काँग्रेसकडून तात्काळ सुधारणेबाबत निवेदन

नगरसेवकांना त्रस्त करून कागदपत्रे गोळा करण्याचे सत्र
अमरावती/7 ऑगस्ट – शहरात जन्म आणि मृत्यू दाखले वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिक प्रचंड तारांबळ उडाली असून दोन महिने उलटूनसुद्धा कागदपत्रे हातात पडत नसल्याने संतापलेल्या काँग्रेस पदाधिकार्यांनी थेट मनपा आयुक्तांना धारेवर धरले.
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत तसेच मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना निवेदन देऊन जन्म मृत्यू दाखल्यांच्या कामात चाललेला सावळागोंधळ तातडीने थांबवण्याची जोरदार मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद केल्यानुसार दाखले वेळेवर मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयीन प्रवेश पारपत्र आधार कार्ड आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मृत्यूनंतर दाखला मिळण्यात होत असलेल्या विलंबा ळे उत्तर अधिकारी दाखला मालमत्ता हस्तांतरण बँक खाते विमा दावे पेन्शन तसेच इतर कायदेशीर प्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागातून येणारे नागरिक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक चकरा माराव्या लागत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये कागदपत्रे पुन्हा मागवून मनपा आणि जिल्हा परिषद कार्यालयात हेलपाटे मारायला लावले जात असून तीन महिने झाले तरी दाखले मिळत नाहीत. काँग्रेस शिष्टमंडळाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्याची मागणी केली.
यावेळी यासिर भारती, गुरु हमीर, नसीम खान पब्बू, सादीक शाह, इसामा आलम, निसार खान ओ.के., डॉक्टर आबिद हुसेन, डॉक्टर फिरोज खान, राजिक सर, युसूफ सौदागर, जुबेर खान, आमिर शेख, अब्दुल अजीम, शेख रेहान, सई्यद पंटर, अब्दुल नईम, अब्दुल रौफ, अकरम अली, हुसेन खान, मोईज खान, शेख रेहान, जुनेद खान, प्रभाकर वळसे, मततीन, मोईज खान, जुबेर एस. के. यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.




