दुचाकीला वाचवताना ट्रॅक्टर उलटला
थोडक्यात वाचले शेतकर्याचे प्राण

-अरुंद पांदन रस्त्यामुळे अपघात
अंजनगाव बारी/ 25 जून : शेताकडे जाणार्या अरुंद पांदन रस्त्यावर दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटल्याची घटना अंजनगाव बारी येथे गावठाणाकडे जाणार्या केसरी शेतशिवारात आज बुधवार, 25 जून रोजी सकाळी घडली. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही. शेतकर्याचे प्राण थोडक्यात वाचले. या अपघातामुळे अंजनगाव बारी शिवारातील दुर्दशाग्रस्त अरुंद पाणंद रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अंजनगाव बारी शिवारातील बहुतांश पांदन रस्ते कमी रुंदीचे असल्यामुळे शेतकर्यांना शेतात ये-जा करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पांदन रस्त्यांनी वाहने विशेषत: ट्रॅक्टर चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अतिक्रमनामुळे पांदन रस्त्यांची रुंदी आणखीनच कमी झाली आहे. आता तर हे रस्ते अपघातप्रवणही बनले असल्याचेच आजच्या अपघातावरुन दिसून येत आहे. गावठाण्याकडे जाणार्या केसरी शेतशिवार रस्त्यावर सकाळच्या सुमारास दुचाकीस्वार शेतकर्याला वळनावर वाचवण्याच्या प्रयत्नात शेतकरी जीवन हटवार यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला नाल्यात उलटला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले.
या अपघातानंतर शेतकर्यांनी पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण त्वरित काढण्याची मागणी केली आहे. शेतकर्यांच्या सोयीसाठी तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून त्यांची योग्य रुंदी राखावी, पाणंद रस्ते योजना राबवून त्यांना मदत करावी. शेतकर्यांमध्ये पाणंद रस्त्यांचे महत्त्व आणि त्यांच्या योग्य वापरासाठी जागरूकता निर्माण करावी असे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
काही ठिकाणी पाणंद रस्ते अत्यंत अरुंद होत चालले आहे. त्याचा त्रास शेतकर्यांना शेतीची कामे करताना सोसावा लागत आहे. या रस्त्यांनी शेतकर्यांना शेतीमाल ट्रॅक्टर किंवा इतर मोठ्या वाहनाने नेताना अडचणी येत आहे. तसेच शेतीची मशागत करण्यासाठी, बियाणे, खते आणि इतर साहित्य वाहून नेताना समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे, शेतकर्यांचे म्हणणे आहे.




