आता मोबाईलवर दिसेल शाळा बसचे लाइव्ह लोकेशन

नियम मोडल्यास बसचे परवाने रद्द होणार

अमरावती /3 ऑगस्ट– शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी राज्य शासनाने नवीन शाळा बस धोरण लागू केले आहे. आता प्रत्येक शाळा बस आणि व्हॅनमध्ये जीपीएस ट्रॅकर्स, सीसीटीव्ही, स्पीड गव्हर्नर, पॅनिक बटण आणि प्रशिक्षित महिला अटेंडंट अनिवार्य असेल. यामुळे पालकांना स्वतःच्या मोबाईलवर बसचे लाइव्ह लोकेशन तसेच मुले बसमध्ये चढल्या-उतरल्याची माहिती रिअल-टाइम अलर्टद्वारे तातडीने मिळेल.
नवीन व्यवस्थेनुसार शाळा व्यवस्थापन, चालक आणि मालकांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास बसचा परवाना निलंबित अथवा रद्द केला जाऊ शकतो. जिल्ह्यात 996 शाळा बस व व्हॅनपैकी 940 वाहने पात्र ठरली असून 56 वाहने मानकांवर अपूर्ण आहेत. बसमध्ये आरएफआयडी आणि बायोमेट्रिकने विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाईल. शाळा किंवा बस चालक संपूर्ण वर्षाची फी आगाऊ वसूल करू शकणार नाहीत, ती मासिक किंवा त्रैमासिक स्वरूपातच घ्यावी लागेल. मनमानी फी वाढल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय कारवाई करेल. परिवहन विभागाची पथके नियमित तपासणी करतील. सुरक्षा मानकांचे पालन न करणार्‍या वाहनांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल. 56 अपात्र वाहनांवर शासन कधी कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button