कौशल्य विकासाच्या नावाखाली लाखोंचा कथित गैरव्यवहार
बेरोजगारांची स्वप्ने धुळीस, शासनालाही आर्थिक फटका

येवदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
दर्यापूर /2 ऑगस्ट- राज्य शासनाच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणार्या प्रशिक्षण उपक्रमात कथित गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नागपूर येथील पुष्पांचल फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या प्रशिक्षणाबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आल्याने कौशल्य विकास योजनांच्या अंमल बजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माहितीनुसार, दर्यापूर तालुक्यातील स्वर्गीय बाळाभाऊ काळे स्किल सेंटर, लोतवाडा येथे 15 ते 45 वयोगटातील सुमारे 480 युवक-युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रशिक्षण न देता 360 प्रशिक्षणार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करून प्रशिक्षण सुरू असल्याचे कथितरित्या दाखविण्यात आले. या आधारे शासनाकडून 34 लाख 57 हजार रुपयांचा पहिला हप्ता संबंधित संस्थेच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत अमरावती विभागाचे उपायुक्त दत्तात्रय लक्ष्मण ठाकरे यांनी डिसेंबर 2025 मध्ये प्रशिक्षण केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान प्रशिक्षणार्थी किंवा प्रशिक्षक कोणीही उपस्थित नसल्याचे निदर्शनास आल्याने अधिक सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार हा तपास यवतमाळ येथील उपायुक्तांकडे सोपविण्यात आला. त्यांच्या चौकशीतही प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरूनसल्याचे समोर आल्याचे सांगितले जाते. चौकशी अहवालात प्रशिक्षण न देता शासनाच्या निधीची उचल करण्यात आल्याचा तसेच कौशल्य प्रशिक्षणाच्या आशेवर असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची फसवणूक झाल्याचा उल्लेख करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे शासनाच्या रोजगाराभिमुख योजनांच्या विश्वासार्हतेवरही परिणाम झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारचे कथित गैरव्यवहार इतर प्रशिक्षण केंद्रांमध्येही झाले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कौशल्य विकास योजना ही युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणारी महत्त्वाची योजना मानली जाते. मात्र, कागदोपत्री प्रशिक्षण दाखवून निधी उचलला जात असल्याचे आरोप खरे ठरल्यास त्याचा सर्वाधिक फटका रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या युवकांना बसणार असून शासनाच्या कल्याणकारी योजनांवरील विश्वासही डळमळीत होऊ शकतो.दरम्यान, उपायुक्त दत्तात्रय ठाकरे यांनी चौकशी अहवाल शासनाकडे सादर केल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार येवदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रफुल्ल गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या कथित गैरव्यवहारामागील संपूर्ण साखळी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.




