धारणीत कोट्यवधींचे पथदिवे धूळखात

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

अमरावती/2 ऑगस्ट- धारणी नगरपंचायतीच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेली सजावटीची दिव्यांची व्यवस्था काही ठिकाणी पूर्णपणे बंद पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य, कामातील निष्काळजीपणा आणि देखभालीचा अभाव यामुळे सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाल्याचा आरोप होत असून, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
धारणी नगरपंचायतीमार्फत शहर सुशोभीकरणाच्या उद्देशाने विविध चौकांमध्ये सजावटीचे दिवे बसविण्यात आले होते. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला. मात्र काम पूर्ण होऊन काही काळ लोटताच अनेक ठिकाणचे दिवे बंद पडले. त्यामुळे शहराचे सौंदर्य वाढविण्याऐवजी ही योजना निष्प्रभ ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार कामात दर्जेदार साहित्याचा वापर झाला नसल्यामुळे दिव्यांची यंत्रणा अल्पावधीतच निकामी झाली. संबंधित कामाची योग्य तपासणी झाली का, दर्जाची खातरजमा करण्यात आली का आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्याची जबाबदारी कोणी स्वीकारली, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.नगरपंचायत प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संपूर्ण कामाची तांत्रिक तपासणी करावी, दोष निश्चित करून संबंधित कंत्राटदार, अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या कामांचा दर्जा कायम ठेवला गेला नाही, तर अशा विकासकामांवरील नागरिकांचा विश्वास कमी होईल, अशी प्रतिक्रिया शहरात उमटत आहे. सार्वजनिक पैशांचा प्रत्येक रुपया जनतेच्या हितासाठी खर्च झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button