शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी ई-केवायसीची गती वाढवावी

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

अमरावती /31 जुलै : जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. लवकरच उर्वरीत शेतकर्‍यांची यादी येणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत जिल्ह्यातील पहिल्या यादीतील 76 हजार 976 शेतकर्‍यांची ई-केवायसी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज तालुकास्तरावरील सहायक निबंधक आणि बँकांचे प्रतिनिधी यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा उपनिबंधक राजेश भुयार, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी येरेकर यांनी कर्जमाफीची प्रक्रिया राबविताना बँकांनी सजगपणे काम करणे आवश्यक आहे. बँकेच्या शाखेमधून प्रत्येक कर्जदार शेतकर्‍यांना दूरध्वनी करून त्यांना कर्जमाफीची माहिती देण्यात यावी. त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात यावे. शेतकर्‍यांना प्रामुख्याने 2 लाख रूपयांची कर्जमाफी होणार आहे, याबाबत माहिती देण्यात यावी. कर्जमाफी होण्यासाठी ग्रीस्टॅक हा महत्वाचा आहे. ग्रीस्टॅक नोंदणी नसल्यास तातडीने ही नोंदणी करण्यास शेतकर्‍यांना सांगावे. याकामी बँकांनी प्रयत्नपूर्वक कार्य करणे अपेक्षित आहे. कर्जमाफीच्या अनुषंगाने येत्या शनिवार आणि रविवारी बँकांचे कामकाज सुरू ठेवण्यात यावे. याकामी स्वतंत्ररित्या दोन नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी. त्यांच्याकडून कर्जमाफीबद्दल योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. कर्जमाफीच्या प्रक्रियेत शेतकर्‍यांची सहमती घेताना त्यांना कर्जाच्या रकमेमध्ये फरक दिसत असला तरी उर्वरीत रक्कम बँक समायोजित करीत असल्याची माहिती देण्यात यावी. कर्जमाफीच्या प्रक्रियेत काही तक्रारी असल्यास त्या तात्काळ कळविण्यात याव्यात. त्यानुसार डाटामध्ये दुरूस्ती करण्यात यावी.जिल्ह्यात अद्यापही 76 हजार 976 ई-केवायसीपैकी 43 हजार 432 शेतकर्‍यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. आपले सरकार केंद्र येथे शेतकर्‍यांची ही केवायसी मोफत होणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button