उमेश कोल्हे कुटुंबियांकडून न्यायासाठी एनआयए कोर्टात वकिलांची फौज

अमरावती/29 जुलै : देशभरात खळबळबळ उडवून देणार्‍या येथील बहुचर्चित उमेश कोल्हे हत्याप्रकरणाला आता वेगळे कायदेशीर वळण मिळाले आहे. या प्रकरणातील पुढील न्यायालयीन लढ्यासाठी फिर्यादी आणि पीडित कोल्हे कुटुंबाच्या वतीने मुंबई येथील ‘एनआयए’ स्पेशल सेशन्स कोर्टात नामवंत कायदेतज्ञांचे वकीलपत्र दाखल करण्यात आले आहे. या हायप्रोफाइल खटल्यात पीडित पक्षाची बाजू मांडण्यासाठी ख्यातनाम वकीलांची नियुक्ती करण्यात आली आहे.मिळालेल्या माहिती नुसार, बुधवार, 29 जुलै रोजी मुंबईतील विशेष एनआयए न्याया लयात फिर्यादी आणि पीडित कोल्हे कुटुं बीयांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी देशातील नामवंत विधिज्ञांनी हजेरी लावली. यामध्ये अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर, अ‍ॅड. गणेश नागरगोजे, अ‍ॅड. खेताराम सोळंकी, अ‍ॅड. संकेत राव, अ‍ॅड.तेजस सावंत आणि अ‍ॅड. श्रीराम चिंदरकर या दिग्गज वकिलांचा समावेश आहे. यापुढील सर्व न्यायालयीन कामकाज, युक्तिवाद, साक्षी-पुराव्यांची तपासणी आणि कायदेशीर प्रक्रिया या सर्व तज्ज्ञ विधिज्ञांच्या मार्गदर्शना खाली पार पडणार आहे.

काय आहे प्रकरण

21 जून 2022 रोजी अमरावती येथे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची अत्यंत निर्घृणपणे गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. तपासादरम्यान समोर आलेल्या धक्कादायक पुराव्यांमुळे या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय आणि दहशतवादी कटाशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे वर्ग केला होता.

सोशल मीडिया पोस्टवरून रचला कट

‘एनआयए’ने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, सोशल मीडियावरील एका विशिष्ट पोस्टचे समर्थन केल्याच्या रागातून उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. या प्रकरणात एनआयएने अनेक आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. देशभरात गाजलेल्या या संवेदनशील प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीकडे आता संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी फिर्यादी पक्षाने न्यायालयासमोर भक्कमपणे बाजू मांडण्याची पूर्ण तयारी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button