जुनी वस्ती तिकीट बुकिंग कार्यालय रात्री बंद

प्रवाशांना वेळेवर तिकिटासाठी करावी लागते धावपळ

रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे गाडी सुटण्याचे प्रमाण वाढले

अमरावती/27 जुलै- बडनेरा रेल्वे स्थानकाच्या जुनी वस्ती येथील तिकीट बुकिंग कार्यालय रात्री बंद राहत असल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडत आहे. वेळेवर तिकीट न मिळाल्याने अनेक प्रवाशांची ट्रेन सुटत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणारा हा त्रास दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
बडनेरा रेल्वे स्थानकावरून दररोज 55 ते 60 गाड्या जातात. हजारो प्रवासी या गाड्यांनी ये-जा करतात. रेल्वे स्थानकाच्या नवी वस्ती आणि जुनी वस्ती अशा दोन्ही बाजूला तिकीट बुकिंग कार्यालये आहेत. परंतु जुनी वस्ती येथील तिकीट बुकिंग कार्यालय रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असते. त्यामुळे प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी नवी वस्ती येथील कार्यालयापर्यंत लांबचा फेरा मारावा लागतो. या वेळेत दुरांतो एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस, भगत की कोठी यांसारख्या महत्त्वाच्या गाड्या धावतात. तिकीट न मिळाल्याने अनेकदा प्रवाशांची गाडी सुटते. त्यामुळे हे कार्यालय रात्रीही सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. बडनेरा रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला पूर्वी वाहन पार्किंग होते. परंतु चार महिन्यांपूर्वी नवी वस्ती येथील पार्किंग बंद करण्यात आले. पार्किंग एका बाजूला आणि तिकीट काउंटर दुसर्‍या बाजूला असल्याने प्रवाशांची प्रचंड कसरत होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button