जलजीवन योजनेच्या खड्ड्याने 3 वर्षाच्या नायराला गिळले!
ठेकेदार, अधिकार्यांच्या बेफिकिरीने चिमुकलीचा तडफडून अंत

चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावातील संतापजनक घटना
अमरावती/29 जुलै – मेळघाटमधील आदिवासींच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याच्या केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन योजनेने 3 वर्षीय आदिवासी मुलीचा बळी घेतला आहे. या घटनेनंतर मेळघाटात संतापाची लाट उसळली असून लोकप्रतिनिधी, प्रशासन व ठेकेदाराविरुद्ध थेट खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी होत आहे.
आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार चिखलदरा तालुक्यातील चुर्णी गावाजवळील कोरडा या आदिवासी बहुल 400 लोकवस्तीच्या गावात जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू होते. या विकास कामाच्या नावाखाली गावात अनेक ठिकाणी 3 फुटावरून जास्त खड्डे खोदले गेले होते. पावसाळ्याच्या दिवसात घरोघरी पाणी पोहोचवणारी योजना नायरा संजीव बुसुम या 3 वर्षांच्या बालिकेचा बळी घेऊन गेली. बुधवारी सकाळी नायरा घरासमोर खेळत होती आणि खेळता खेळता ती अचानक पाणी भरलेल्या खड्ड्यामध्ये पडली व क्षणात हसते खेळते मूल नाहीसे झाले. काही वेळानंतर पालकांना नायरा घरात नसल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी शोधशोध सुरू केली. गावातील लोकांनी शोध सुरू केल्यानंतर घरासमोरील खड्ड्यात नायराचा मृतदेह सापडला. सकाळपर्यंत हसत खेळत असणारी नायरा पाण्याने फुगून गेली होती. गावात प्रचंड खळबळ माजली तोवर पोलिसांना कळवण्यात आले. दुपारी 3 वाजता चिखलदरा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. दरम्यान चुर्णी ग्रामीण रुग्णालयात नायराच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले व सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले.
विकासकामांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह-मेळघाटातील या घटनेने प्रशासकीय निष्काळजीपणाची पोलखोल केली आहे. लोकांना सुविधा देण्यासाठी असलेल्या योजना जर सुरक्षेच्या अभावामुळे नागरिकांच्या जिवावर उठणार असतील, तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. याप्रकरणी आता पोलीस आणि प्रशासन काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
ठेकेदार आणि अधिकार्यांवर गुन्हे दाखल करा
कोरडा गावात जलजीवन मिशनअंतर्गत पाइपलाइनचे काम सुरू असून गावातील विविध भागात खोल खड्डे खोदण्यात आले आहेत. मात्र, काम सुरू असलेल्या ठिकाणी ना कोणती सुरक्षेची जाळी लावण्यात आली होती, ना कोणती ताकीद देणारा बोर्ड लावला होता. ठेकेदार आणि संबंधित अधिकार्यांच्या या बेजबाबदारपणामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करत ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. याप्रकरणी दोषी ठेकेदार व अधिकार्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामपंचायतचे हात वर
कोरडा गावात विकास कामे सुरू होती. सरपंच सोनाली सावलकर यांनी या घटनेनंतर हात वरते केले असून विकास काम कोण करीत होते हे आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय गावात शासकीय योजनेचे काम होत नाही. हे उघड असताना सरपंचांनी मात्र जबाबदारी झटकली आहे.
अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल
आमच्या प्रतिनिधीने चिखलदरा पोलीस स्टेशनचे एपीआय प्रवीण कुमार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की, या घटनेची अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असून भारतीय न्याय संहिताच्या 194 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणत्याही व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. प्राथमिक तपासात या मृत्यूला कोण जबाबदार आहे, या निष्कर्षावर पोलीस आले नसून विकास काम करणारा ठेकेदार कोण होता किंवा कोणाच्या परवानगीने हे काम सुरू होते यावर आम्ही तपास करीत आहोत.





