शिक्षकांची बस पलटी; एक गंभीर, 15 जखमी

धोकादायक गतिरोधकांवर नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

अंजनगाव सुर्जी / 25 जुलै: अकोट-अंजनगाव सुर्जी मार्गावरील भंडारज येथील पेट्रोल पंपाजवळ रविवारी (दि. 26) दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास शिक्षकांना घेऊन जाणारी णझ 70 जढ 1924 क्रमांकाची टुरिस्ट बस भीषण अपघातग्रस्त होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात एका शिक्षकाला गंभीर दुखापत झाली असून 15 शिक्षक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, वरूड तालुक्यातील शिक्षक शेगाव येथे आयोजित शिक्षक अधिवेशनाला उपस्थित राहून परतीच्या प्रवासाला निघाले होते. भंडारज येथील पेट्रोल पंपाजवळ बस आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस अचानक पलटी झाली. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील शिक्षकांना बाहेर काढत तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यामुळे अनेक जखमींना वेळीच उपचार मिळू शकले.
या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये दिनेश रमेश खाडे (47, वरूळ), राजेश सुरेश केचे (42, वरूळ), अभिजित अनिल देशमुख (35, वरूळ), तुषार गुलाब घाटोळ (46), नितीन वासुदेव तोटे (46, वरूळ), महेंद्र पंजाब खापरे (48, वरूळ), पुरुषोत्तम अशोक गेडाम (40, वरूळ), मदान देवानंद वानखडे (36, जरूळ) आणि चांददास घाटोळ (45, वरूळ) यांचा समावेश आहे. उर्वरित जखमी शिक्षकांवरही उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. गंभीर जखमी असलेल्या एका शिक्षकाला पुढील उपचारासाठी अमरावतीजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी भंडारज येथील रस्त्यावर उभारण्यात आलेल्या धोकादायक व अवैज्ञानिक गतिरोधकांवर गंभीर आक्षेप घेतला. काही दिवसांपूर्वी उभारण्यात आलेल्या या गतिरोधकांवर पांढरे परावर्तित पट्टे नाहीत, इशारा फलक नाहीत आणि आवश्यक सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आलेले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे विशेषतः बाहेरगावच्या वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नसून या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या ठिकाणची तातडीने तांत्रिक पाहणी करून धोकादायक गतिरोधक हटवावेत किंवा नियमानुसार सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भडारज परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, या अपघाताची पुढील चौकशी सुरू असून नेमके कारण शोधण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button