शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

2025-26 च्या नुकसानग्रस्तांना अद्याप मदत नाही

* खरीप हंगामात संतापाची लाट

अचलपूर /3 जुलै: अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत शेती कसणार्‍या शेतकर्‍यांच्या पदरात पुन्हा एकदा निराशाच पडल्याचे चित्र आहे. मागील खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर पीकहानी होऊनही अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नसल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सरकारने केलेल्या घोषणांचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने आश्वासनांचे पीक भरघोस, पण मदतीचे उत्पादन शून्य अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.
मागील वर्षी जुनी पंतप्रधान पीक विमा योजना बंद करून नव्या पीक विमा योजनेत शेतकर्‍यांचा सहभाग घेण्यात आला. शेतकर्‍यांनी नियमाप्रमाणे विम्याचा प्रीमियम भरूनही 2025-26 च्या खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक भागांत उत्पादन जवळपास शून्यावर आले. पीक कापणी प्रयोगांतही अत्यल्प किंवा शून्य उत्पादनाची नोंद झाल्याचे सांगितले जात असतानाही जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्‍यांना विमा भरपाईचा लाभ मिळालेला नाही.
शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री यांनी नुकसानग्रस्तांना हेक्टरी 17 हजार रुपयांपर्यंत मदत मिळेल, अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात अनेकांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही. काही ठिकाणी अत्यल्प रक्कम जमा झाल्याने शेतकर्‍यांची चेष्टा झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे 2025-26 चा हंगाम संपून आता 2026 चा खरीप हंगाम सुरू झाला आहे. नवीन पेरणीसाठी शेतकर्‍यांनी कर्ज काढून, साठवलेली पुंजी खर्च करून बियाणे, खते व इतर शेती साहित्याची खरेदी केली आहे. त्यातच अल-निनोच्या संभाव्य परिणामामुळे यंदाच्या हंगामाबाबतही अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत मागील हंगामातील विमा भरपाई न मिळाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू झाली असली तरी ती अल्पावधीत बंद पडल्याचा आरोपही शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे उत्पादनाला योग्य भाव मिळाला नाही आणि विम्याची भरपाईही हाती पडली नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही प्रभावी भूमिका घेतली नसल्याची नाराजी शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे. सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर ठोस आवाज उठवण्यात अपयशी ठरल्याची टीका होत आहे.
मागील हंगामातील नुकसानभरपाई आणि पीक विम्याची प्रलंबित रक्कम तातडीने वितरित करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अन्यथा आर्थिक संकट अधिक गडद होईल, अशी मागणी अचलपूरसह अमरावती जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून जोर धरत आहे. सरकारने केवळ घोषणांचा वर्षाव न करता प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा आता बळावली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button