अवैध दारू विक्रेत्यांवर अंजनगाव सुर्जी पोलिसांची धडक कारवाई

1.10 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अंजनगाव सुर्जी/3 जुलै  : पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन आरोपीं विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार 2 जुलै 2026 रोजी अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, एक इसम मोटारसायकल वरून खोडगावकडून पांढरी-खानामपूर मार्गे अवैध देशी दारू विक्रीसाठी घेऊन जात आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपले नाव अभिजित दीपक गायगोले (वय 28, रा. गुलजारपुरा, अंजनगाव सुर्जी) असे सांगितले. त्याने जप्त केलेली दारू लाला चौक येथील भट्टीतून आणल्याची कबुली दिली. पुढील तपासात संबंधित भट्टीचा व्यवस्थापक नितेश गणेशराव बुंदिले (वय 36, रा. कोकाटखेल, अंजनगाव सुर्जी) यानेच हा माल दिल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तपासणीदरम्यान गोल्डन संत्रा कंपनीच्या 90 एमएलच्या 100 सिलबंद पावट्या (किंमत 5,000 रुपये) तसेच टँगो पंच कंपनीच्या 90 एमएलच्या 100 सिलबंद पावट्या (किंमत 5,000 रुपये) असा एकूण 10 हजार रुपयांचा अवैध देशी दारूचा साठा जप्त केला. याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली होंडा युनिकॉर्न (क्रमांक एमएच-27 डी डब्लू-2597) मोटारसायकल (किंमत 90 हजार रुपये) आणि अँड्रॉइड मोबाईल (किंमत 10 हजार रुपये) असा एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरज बोंडे, पोउपनि भारत खिरेडे, पोहेकॉ.जयसिंग चव्हाण,पो.कॉ. आकाश रंगारी आणि मोहसिन पठाण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

संबंधित बातम्या

Back to top button