शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा दणका

* गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले; कारवाईची मोहीम
अमरावती/29 जून– अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त यांनी गंभीर पावले उचलली असून, शहरात धुमाकूळ घालणार्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध आता कठोर कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व दहा पोलीस ठाण्यांमधील अशा गुन्हेगारांची कसून तपासणी केली जात आहे, ज्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे आणि जे नागरिक व शांततेसाठी धोकादायक बनले आहेत.
पोलीस प्रशासनाने पहिल्या टप्प्यात सहा ते सात सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्यानुसार प्रस्ताव तयार केले आहेत. या कारवाईमुळे संबंधित गुन्हेगारांना वर्षभरासाठी कारागृहात डांबले जाणार असून, यामुळे गुन्हेगारीला मोठी लगाम बसणार आहे. यासोबतच शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या परंतु गुपचूप शहरात प्रवेश करून पुन्हा गुन्हे करत असलेल्या गुंडांची यादीही पोलिसांनी तयार केली आहे. मारामारी, हाणामारी, धमकावणे आणि खंडणी वसुली अशा कृत्यांत गुंतलेल्या गुंडांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांचे एक विशेष पथक गेल्या अनेक दिवसांपासून या गुन्हेगारांच्या जुन्या नोंदी, प्रलंबित प्रकरणे, जामीन मिळाल्यानंतरच्या हालचाली आणि त्यांचा स्थानिक परिसरातील प्रभाव याचा सखोल अभ्यास करत आहे. शहरात भीतीचे वातावरण निर्माण करणार्यांवर वचक बसवण्यासाठी ही कारवाई अनिवार्य असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कायदा मोडणार्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला असून ही मोहीम यापुढेही निरंतर सुरू राहणार आहे.
गुन्हेगारी मुक्तीचा कडक संकल्प-शहरातील शांतता टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांविरुद्ध कठोर पवित्रा घेतला आहे. सराईत गुंडांची कुंडली तपासली जात असून ‘एमपीडीए’ आणि हद्दपारीसारखी कडक पावले उचलली जात आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असून, सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन कोणताही धोका पत्करायला तयार नाही. कायदा हातात घेणार्यांची गय केली जाणार नाही.




