अमरावती ग्रामीण पोलिसांचा नवा स्तुत्य उपक्रम
दर शनिवारी तक्रार निवारण दिन साजरा, दोनशे तीन तक्रारींचा जागेवरच निपटारा

अमरावती/29 जून– ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिन आयोजित केला जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करणे आणि पोलीस-जनता यांच्यातील संवाद अधिक मजबूत करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्याच तक्रार निवारण दिनामध्ये एकूण 203 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. शनिवार 27 जून रोजी आयोजित पहिल्या तक्रार निवारण दिनादरम्यान पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी सरमसपुरा पोलीस ठाण्याची पाहणी केली. तर दुसरीकडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड हे चांदूर बाजार पोलीस ठाण्यात स्वतः उपस्थित होते.या मोहिमेदरम्यान संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आपापल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्यांमध्ये उपस्थित राहिले होते. तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारींनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत त्यांच्या तात्काळ निवारणाची प्रक्रिया सुरू केली. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अमरावती ग्रामीणच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये प्राप्त झालेल्या एकूण 203 तक्रारींचे यशस्वी निवारण करण्यात आले.पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की, त्यांनी प्रत्येक शनिवारी आयोजित होणार्या या तक्रार निवारण दिनामध्ये आपल्या संबंधित पोलीस ठाण्यात पोहोचून आपल्या समस्या आणि तक्रारी नोंदवाव्यात, जेणेकरून त्यांचे वेळेत आणि प्रभावीपणे निवारण केले जाऊ शकेल.




