शिवभोजन थाळी योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी
आ.संजय खोडके यांची विधानसभेत लक्षवेधी

मुंबई/23 जून- महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरोनाकाळात या योजनेचे महत्व अधोरेखित झाले असून आज गरीब,गरजू व श्रमजीवी वर्गाला या थाळी योजनेमुळे पोट भरण्याची सोय मिळाली आहे. बाजार समिती , सरकारी हॉस्पिटल अशा ठिकणी लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आज शिवभोजन योजनेचा विस्तार करून आवश्यक बदल करून योजनेचा निष्ठांक व अनुदान वाढविण्याची मागणी आ.संजय खोडके यांनी विधान परिषदेतून केली आहे.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी वरिष्ठ सभागृहातील दुसर्या दिवसाच्या कामकाजा दरम्यान अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण विभागाच्या संबंधित प्रश्नावर चर्चा सुरु असतांना आ.संजय खोडके यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. आ. संजय खोडके यांनी सांगितले कि, कोरोना काळापासून शिव भोजन थाळी योजना सुरु करण्यात आली असून गरीब व गरजू घटकांकरिता हि योजना अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेअंतर्गत अवघ्या 10 रुपयांमध्ये 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण आणि 1 मूद भात दिला जातो. खर्या अर्थाने रुग्णालय परिसर व बाजार समिती भागात या योजना सुरु असल्याने गरीब , गरजू व श्रमजीवी वर्गाला जेवणाची सोय मिळाली असल्याने हि एक शासनाची अत्यंत चांगली योजना आहे. पुढेही हि योजना अशीच सुरु राहण्यासाठी व जास्तीतजास्त गरजूंना याचा लाभ मिळण्यासाठी आणखीन नवीन शिव भोजन केंद्र वाढविण्याची गरज आहे. तसेच शिवभोजन थाळीतील पदार्थामध्ये काही पौष्टिक व पोषणयुक्त पदार्थांचासमावेश करण्यात यावा. आजच्या महागाईप्रमाणे शिव भोजन केंद्र चालकांना अनुदान देण्यात यावे, हि योजना बंद होऊ नये म्हणून नियमित अनुदान देणे सुद्धा आवश्यक आहे. याकरिता योजनेचा विस्तार करण्यास आवश्यक बदल करण्याची मागणी करीत आ.संजय खोडके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर उत्तर देतांना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनराव भुजबळ यांनी सांगितले कि, सुरवातीच्या काळात शिव भोजन केंद्रांचे अनुदान हे साधारणतः सहा महिने प्रलंबित राहत होते. यासंदर्भात शासनाचे सर्व अडचणीचे निराकारण करून आता मात्र योजनेचे शासकीय अनुदान दर महिन्याला नियमित दिले जात आहे. अनेक हॉस्पिटल व बाजार समिती परिसरात शिव भोजन थाळी योजना सुरळीतपणे कार्यान्वित असून आणखीन नव्याने केंद्र वाढविण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मंत्रीमहोदयांनी आपल्या उत्तरात सांगितले. हॉस्पिटल व बाजार समिती सारख्या परिसरात योजनेचा निष्ठांक वाढविणे व नवीन केंद्र सुरु करण्यास प्राधान्याने परवानगी देणार असल्याचे सुद्धा ना. छगनराव भुजबळ यांनी सभागृहासमक्ष सांगितले.




