योग मानवतेला एकत्र आणणारी शक्ती
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा जगाला संदेश

कोलकाता /21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त कोलकाता येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत मानवतेला एकत्र जोडण्याचा संदेश दिला. योग हा केवळ व्यायाम किंवा शारीरिक श्रमाचा प्रकार नसून तो मानवी चेतना, ऊर्जा आणि एकतेचा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम बंगाल ही रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या महान संतांची भूमी असल्याचे नमूद करत मोदी म्हणाले की, या संतांनी योग आणि अध्यात्माचा संदेश जगभर पोहोचवला. अशा पवित्र भूमीवर हजारो लोकांसोबत योगाभ्यास करणे हा एक अद्वितीय आध्यात्मिकअनुभव आहे. महर्षी अरविंद यांच्या विचारांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, आपल्याला जाणीव असो वा नसो, आपले संपूर्ण जीवनच योग आहे. जेव्हा योग जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनतो, तेव्हा तो व्यक्तीला स्वतःशी आणि समाजाला मानवतेशी जोडतो. योग कोणत्याही एका वयोगटापुरता मर्यादित नसून तो प्रत्येकासाठी जीवन समृद्ध करणारा मार्ग आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतात, हिमालयापासून हिंद महासागरापर्यंत, ईशान्य आणि पूर्वेकडील बंगालपासून पश्चिमेकडील सौराष्ट्रापर्यंत, संपूर्ण देश योगाच्या उर्जेने भारलेला दिसतो. संपूर्ण जग आणि संपूर्ण देश एकमेकांशी जोडलेले आहेत असे वाटते, आणि हीच योगाची शक्ती आहे. योग सर्वांना एकत्र आणतो.या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या महान व्यक्तिमत्त्वांचे स्मरण केले. ते म्हणाले, आज योग दिनानिमित्त बंगालमध्ये असणे खूप विशेष आहे. बंगालची ही पवित्र भूमी, जिथे भगवान रामकृष्ण परमहंसांसारख्या सिद्ध संतांनी अवतार घेतला, जिथे स्वामी विवेकानंदांनी उदय होऊन संपूर्ण जगाला योगाची ओळख करून दिली, जिथे महर्षी अरविंदांसारख्या महान योगींचा जन्म झाला, जिथे लहरी महाशयांसारख्या महान योगींनी योग परंपरेला नव्या उंचीवर नेले, आज या भूमीवर सामूहिक योगाचा अनुभव एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव देत आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचेही स्मरण केले. ते म्हणाले, बंगालमध्ये जन्मलेल्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा असा विश्वास होता की, मानवी ओळख ही एकाकीपणात नसून आपल्या सभोवतालच्या जगाशी असलेल्या संबंधात आहे. हाच संबंध योगाचे सार आहे.




