तोंडाच्या कर्करोगामागे तंबाखू प्रमुख कारण; जनजागृतीची गरज

अमरावती/31 मे : तंबाखूचे कोणतेही स्वरूप सुरक्षित नसून गुटखा, खैनी, खर्रा तसेच नव्या स्वरूपातील निकोटीन उत्पादने तरुणांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत, असा इशारा मैक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,नागपूर येथील असोसिएट डायरेक्टर – रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि रेडिओसर्जरी, डॉ. शिजान परवेज यांनी जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त दिला.एक रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून दररोज कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी आधुनिक किरणोत्सर्ग उपचार तंत्रज्ञानाचा वापर करताना, अनेकदा अशा रुग्णांवर उपचार करावे लागतात ज्यांचा आजार तंबाखूच्या सेवनाशी संबंधित असतो, असे डॉ. परवेज यांनी सांगितले. तंबाखू हे केवळ कर्करोगाचे जोखीम कारण नसून अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांचे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्या धूम्रपान न करता सेवन केल्या जाणार्या तंबाखूजन्य पदार्थांचे प्रमाण वाढत असून गुटखा, खैनी आणि खर्रा हे सिगारेटपेक्षा सुरक्षित पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुटखा सेवन करणार्या व्यक्तींमध्ये तोंडाच्या गंभीर आणि चौथ्या टप्प्यातील (टी4) कर्करोगाचा धोका अधिक असतो. चिंतेची बाब म्हणजे आज 30 वर्षांच्या आसपासच्या तरुणांमध्येही तोंड आणि घशाच्या प्रगत अवस्थेतील कर्करोगाची प्रकरणे वाढताना दिसत आहेत.तंबाखू उद्योगाकडून निकोटीन पाऊच, सिंथेटिक निकोटीन उपकरणे आणि ई-सिगारेटसारखी आधुनिक उत्पादने बाजारात आणली जात असून फळांच्या चवी आणि आकर्षक डिझाइनच्या माध्यमातून तरुणांना लक्ष्य केले जात आहे. निकोटीन हे मेंदूवर परिणाम करून व्यसन निर्माण करते आणि अशा उत्पादनांचा वापर करणार्या किशोरवयीन मुलांमध्ये पुढे जाऊन पारंपरिक सिगारेट ओढण्याची शक्यता इतरांपेक्षा सुमारे तीनपट अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.




