मेडिकल रिसर्च संस्थेत दोन लाखांची फसवणूक
मार्केटिंग एक्झिक्युटिव्हने डॉक्टरांचे पैसे स्वतःच्या खात्यात जमा केले

संस्थेचे महत्त्वाचे दस्तऐवज गायब केल्याचा आरोप
अमरावती/18 जून- राजापेठ ठाणे क्षेत्रात संचालित एका मेडिकल रिसर्च सेवा संस्थेशी संबंधित आर्थिक अनियमतता आणि फसवणुकीची खळबळजनक घटना समोर आली आहे. संस्थेच्या अधिकृत प्रतिनिधीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका माजी कर्मचार्याविरुद्ध विश्वासघात, आर्थिक फसवणूक आणि पुरावे नष्ट करण्याशी संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीचे नाव इशांत राजेश जाधव (32, अंबिका नगर) असे आहे.
माहितीनुसार, तक्रारदार रोहन बाबासाहेब भोकरे (39, कृष्णार्पण कॉलनी) यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात बुधवार 17 जून रोजी तक्रार दाखल केली. त्यांची पत्नी डॉ. केतकी रोहन भोकरे यांच्याद्वारे संचालित ’न्यूरॉन इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड रिसर्च’ ही संस्था देशभरातील मेडिकल कॉलेजेस, डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांना रिसर्च, थिसिस आणि पब्लिकेशनशी संबंधित सेवा पुरवते. संस्थेत कार्यरत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह इशांत राजेश जाधव याच्यावर आरोप आहे की, त्याने संस्थेच्या अधिकृत बँक खात्यात रक्कम जमा करण्याऐवजी अनेक डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांकडून थेट स्वतःच्या वैयक्तिक मोबाईल नंबर आणि डिजिटल पेमेंट माध्यमांद्वारे पैसे मिळवले. आरोपीने वेगवेगळ्या वेळी अनेक ग्राहकांकडून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्राप्त करून संस्थेला याची माहिती दिली नाही.
डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांनी सेवा न मिळाल्याने पेमेंट संबंधी तक्रारी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चौकशीत आरोपी इशांत जाधव याने पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र व्यवस्थापनाने त्याला संस्थेतून बाहेर काढले. आरोपीने संस्थेच्या रेकॉर्ड रूममधून स्वतःचा सेवा करार आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवजही गायब केले. राजापेठ पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी इशांत राजेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.




