एसटी भाडेवाढ एका महिन्यासाठी कायम
वाढत्या महागाईचा प्रवाशांवर आर्थिक भार

पंधरा जुलैपर्यंत भाडेवाढ लागू राहणार
अमरावती /18 जून- आर्थिक संकट आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना दिलासा देण्याऐवजी भाडेवाढीची मुदत आणखी एक महिना वाढवली आहे. आता एसटी बसमधील ही अतिरिक्त भाडेवाढ 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम राहणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांच्या गर्दीतून महसूल वाढवण्यासाठी 15 एप्रिलपासून ही तात्पुरती भाडेवाढ लागू केली होती. तिची मुदत 15 जून रोजी संपली होती; मात्र डिझेलच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ पाहता महामंडळाने हा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला. एसटी अधिकार्यांनुसार, डिझेलच्या किमती सध्या प्रतिलीटर सुमारे 97.83 रुपये ते 99.50 रुपयांच्या दरम्यान असून भविष्यात त्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दररोज हजारो लीटर डिझेल लागत असल्याने महामंडळावर लाखों रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. या वाढीव भाड्यानुसार सर्वसामान्य आणि मिडी बस सेवांमध्ये प्रौढांसाठी किमान भाडे 14 रुपये तर लहान मुलांसाठी 7 रुपये निश्चित केले आहे. अमरावती जिल्ह्यासह राज्यातील हजारो प्रवासी दररोज एसटीवर अवलंबून आहेत. त्यामुळे आधीच महागाईने होरपळणार्या ग्रामीण भागातील जनता, विद्यार्थी, नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना पुढील महिनाभर हा भुर्दंड सहन करावा लागेल. महामंडळाने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले असले तरी प्रवाशांमधून मात्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.




