जागतिक योग दिनानिमित्त ठिकठिकाणी योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक
सोहम योगाभ्यासी मंडळाचे आयोजन

अमरावती/12 जून: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योगाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी दस्तुरनगर येथील सोहम योगाभ्यासी मंडळाच्या वतीने शहरातील विविध भागात योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक देणे सुरू केले आहे. आरोग्य ज्ञान आणि जागतिक शांततेसाठी स्थानिक छत्री तलाव परिसराच्या खुल्या मैदानात सोहम योगाभ्यासी मंडळाच्यावतीने गुरूवार दि. 11 जून रोजी सकाळी योगाभ्यासाचे प्रात्याक्षिक केले. तसेच 13 जून रोजी सकाळी 6 वाजतापासून शहराच्या मध्यभागी असलेल्या शिवटेकडी येथे योगाचे प्रात्याक्षिक केले जाणार आहे. त्यानंतर 16 जून रोजी सकाळी 6 ते 7 या वेळात यशोदानगर परिसरातील भीमटेकडी येथे योग महोत्सव साजरा होणार आहे. 21 जून रोजी जागतिक योग दिन असून या दिवसापर्यंत ठिकठिकाणी योगाभ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उपक्रमाचा समारोप जागतिक योगदिनी स्थानिक दस्तुरनगर येथील कमल प्लाझा मंगल कार्यालयालगत श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात होणार आहे. आरोग्य ज्ञान आणि जागतिक शांततेसाठी योगाभ्यासात सहभागी होण्याचे आवाहन सोहम योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष तथा मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, योग प्रशिक्षक दिलीप शेलोटकर यांनी केले आहे.




