विदर्भात अजूनही उकाडा, पेरण्या रखडल्या
शेतकर्यांची चिंता वाढली

-पश्चिम महाराष्ट्रात जोरदार बॅटिंग
मुंबई / 22 जून: मान्सून पावसाने जोर धरला असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील नद्या दुथडी वाहू लागल्या आहेत. वरूण राजाच्या जोरदार बॅटिंगमुळे 95 टक्के महाराष्ट्र पाणीदार झालाय. परंतु विदर्भाकडे वरुणराजानं पाठ फिरवलीय. विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नसल्यानं शेतकरी चिंतेत पडले आहेत. तेथील जनता दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत पावसाची प्रतीक्षा वाढतेय. जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस पडला नाहीये. त्यामुळे 80 टक्के पेरण्या रखडल्या आहेत. शेतकर्यांनी ज्यांनी पावसाच्या आशेने पेरण्या सुरू केल्या, त्यांना बियाण्याच्या नुकसानापोटी आर्थिक फटका बसण्याची चिंता आहे.
निम्मा जून महिना संपला तरी विदर्भातील तापमान कमी झाले नाहीये. शनिवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झालेली दिसून आली. नागपूरमध्ये कमाल तापमान 37.8 अंश होते. आता 24 पासून जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र उकाड्याने नागरिक हौरान झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस पडतोय. अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पूर आले. आता काही ठिकाणी जरी पावसाने विश्रांती घेतलीय. असं असलं तरी कोकण आणि घाटमाथ्यावर आज पावसाचा जोर मात्र कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
रायगड, रत्नागिरी, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. याठिकाणच्या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय.




