जिल्हा परिषदेत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरु

दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील दुसर्‍या रिक्त पदावरील भरतीला लगाम

अमरावती /24 फेब्रुवारी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत सन 2025-26 च्या संचमान्यत ेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडलेली ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी कडक पावले उचलली असून 26 फेब्रुवारीपर्यंत तालुका स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रक्रियेत शून्य शिक्षकी शाळांना पहिले प्राधान्य देण्यात आले असून, ज्या शाळांमध्ये एकही शिक्षक नाही, तिथे तातडीने नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये जिथे आधीच एक शिक्षक कार्यरत आहे, तिथे दुसर्‍या शिक्षकाची नियुक्ती केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिक्षण संचालक आणि आयुक्तांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 28 फेब्रुवारीपर्यंत संबंधित शिक्षकांना जुन्या शाळेतून कार्यमुक्त करणे बंधनकारक असून त्यानंतर त्यांचे वेतन जुन्या शाळेतून काढता येणार नाही. या प्रक्रियेतून फेब्रुवारी अखेर सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षकांना वगळण्यात आले असून त्यांच्या जागी निर्माण होणारी रिक्त पदे समायोजनासाठी उपलब्ध करून दिली जातील. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
प्रशासनाचा कडक पवित्रा-जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवण्याचे आदेश दिले आहेत. 27 फेब्रुवारी रोजी सर्व तालुक्यांनी आपला अहवाल जिल्हा कार्यालयाला सादर करणे अनिवार्य आहे. चुकीची माहिती किंवा कामात हलगर्जीपणा झाल्यास थेट कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button